मुरगूड ( शशी दरेकर ) : गेली शहात्तर वर्षे महाराष्ट्राची जीवन वहिनी म्हणून ख्याती पावलेली लाल परी (एस टी) १ जूनला ७६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
राज्यातील सर्व बस स्थानके फुल माला व तोरणे लावून सजवली जातील.प्रवासी,वाहक,चालक आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे ऋणानुबंध लाल परीने उराशी जपून ठेवले आहेत.
नोकरी वर जाणारा युवक,सासरी जाणारी नववधू,धापा टाकत गाठोड्यासह बस गाठणारा दुकानदार,सरकारी दवाखान्यात दाखल व्हायला निघालेला रुग्ण,पाठीवर स्कूल बॅगचे ओझे वहात टप्प्या टप्प्या वर वाट पहात उभे राहिलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, या सर्वांच्या आठवणी जपून ठेवणारी लाल परी ७६ वर्षांची झाली.
आज दारा दारात चार चाकी गाड्या उभ्या आहेत तरी एस टी ची सर्व बस स्थानके प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरलेली दिसतात.
इतकं प्रेम एस टी ला मिळाले तरी ती उतली नाही मातली नाही.
सुरुवातीला केवळ ३६ बेडफोर्ड गाड्या वर एस टी ने सेवा सुरू केली.खेडो पाड्यातून धावत राहिली.अंगावर लाल धूळ झेलत गावागावात वस्ती करून राहिली. आज १५ हजार बसेस चकचकीत डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यावरून धावत आहेत.
ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग यांना शासनाने दिलेल्या सगळ्या सवलती स्वीकारून डौलाने धावत आहेत. पंढरीची वारी तिच्या विना अधुरीच असते. रेणुका यात्रेत तुणतुणं वाजत राहतं.गणपती उत्सवात मोरया चा गजर सुरू असतो.
निवडणुकात मतांच्या पेट्या आणि आता ई व्हि एम यंत्रे घेवून तीच धावत असते. अशा या लाल परीला जीवन वहिनी,लोक वहिनी इत्यादी बिरुदावल्या सुध्दा अपुऱ्या पाडाव्यात.
अशा या लाल परीला व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष डॉ.माधव कुसेकर यांनी वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाचा वरद हस्त तर आहेच.
एस टी चे जन संपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनीही सर्व कर्मचारी ,चालक,वाहकआगार प्रमुख,स्थानक प्रमुख यांनी हा वर्धापन दिन उत्साहात संपन्न करण्याचे आवाहन केले आहे.
1 thought on “लाल परी (एस टी) चा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर संपन्न होणार”