कागलमध्ये शोकसभेत मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
कागल :
कागल नगरपालिकेचे नगरसेवक विशाल पाटील हे सामाजिक प्रश्नांची जाण असलेले धडाडीचे युवा नेतृत्व होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे या शहराने एक जिंदादिल हरहुन्नरी कार्यकर्ता गमावला आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबियांसह आम्ही सर्वजणच दुःखात आहोत असेही ते पुढे म्हणाले, कागल मध्ये श्री शाहू सांस्कृतिक सभागृहात आयोजित शोकसभेत मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते. सुरुवातीला श्री पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मंत्री श्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी भाषणात श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, श्री विशाल पाटील यांचे कार्य गोरगरिबांच्या प्रश्नावर व विषयांशी आवाज उठणारे होते. सामाजिक प्रश्नावरील त्यांची तळमळ वाखाणण्यासारखी होती. एखाद्या प्रश्न बद्दलचा त्यांचा पाठपुरावा कौतुकास्पद होता. एकदा हातात घेतलेले काम तडीस न्यायचे ही त्यांची वृत्ती होती.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कै. विशाल पाटील हे एक मनमिळावू व उत्साही व्यक्तिमत्वाचे नगरसेवक होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कागल शहराचे फार मोठे नुकसान झाले आहे.
“त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करूया….”
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शिवजयंतीच्या नियोजनाच्या कार्यक्रमात कै.श्री.विशाल पाटील हे आघाडीवर होते. एकूणच शिवजयंती मध्ये महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळणार होते. बानगेचे शहीद जवान राकेश निंगुरे यांच्या आई वडिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बस स्थानक परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करुया अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे शहीद जवान श्री निंगुरे यांच्या आई वडिलांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कै. श्री पाटील यांची शेवटची इच्छा पूर्ण करूया असेही श्री.मुश्रीफ म्हणाले.
स्वागत नगरसेवक प्रवीण काळबर यांनी केले. प्रास्ताविक पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी केले. यावेळी शोकसभेत माजी उपनगराध्यक्ष सदाशिव पिष्टे, प्रकाश मुजुमदार यांचीही भाषणे झाली. आभार संजय चितारी यांनी मानले.