मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील ज्येष्ठ नागरिक संघाची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या वर्धापन दिनी नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे होते.
संघाच्या वर्धापन दिनानिमित्त दिपप्रज्वलन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले . संघाचे उपाध्यक्ष पी. डी. मगदूम यांनी स्वागत केले तर जयवंत हावळ यांनी मयत सभासदांना श्रध्दांजली वाहण्याचा व दुखवट्याचा ठराव मांडला.
संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे म्हणाले जगामध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे अशा परिस्थितीत कुटूंबातील कौटुंबिक संबध लोप पावत आहेत ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबीक संबधात वावरणे कठीण झाले आहे . त्यांना आपले उर्वरीत आयुष्य सुखासमाधानात घालवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघांची गावागावात स्थापन होणेची गरज आहे.
या सभेत संघाचा ताळेबंद मांडण्यात आला. तसेच संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला . यावेळी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला तर मार्च व एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सभेस संघाचे संचालक शिवाजीराव सातवेकर, महादेवराव वाघवेकर, रणजितसिंह सासणे, सदाशिव एकल, रामचंद्र सातवेकर, सिकंदर जमादार, गणपती शिरसेकर, प्रदीप वर्णे, भैरवनाथ डवरी , विनायक हावळ यांच्यासह बहुसंख्य जेष्ठ नागरीक उपस्थित होते. एम. टी. सामंत यांनी आभार मानले.