त्यांनी वाहने अडवली; पण जेवणही करून वाढले!
लिंगनूर कापशी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनामध्ये कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी येथील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यकर्त्यांनी येथील महत्त्वाच्या अशा नाक्यावर ऊस भरून जाणारी शंभरभर वाहने अडवलीच; मात्र त्याचवेळी या वाहनांमधील ड्रायव्हर व क्लीनर यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना जेवण देखील करून वाढले! ‘स्वाभिमानी’च्या येथील कार्यकर्त्यांनी आंदोलनामध्येही जपलेल्या या माणुसकीची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
गतवर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत तसेच एफआरपीचे तुकडे करणारा कायदा रद्द करावा
अशा प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन सुरू आहे. कागल तालुक्यातील गावोगावी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोडी बंद पाडल्या.
लिंगनूर कापशी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे मुरगूड पोलिस स्टेशनची चौकी देखील आहे. याच चौकीच्या ठिकाणी नाक्यावर लिंगनूर कापशी येथील स्वाभिमानी शेतकरी – संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाची वाहने सीमा भागातून कर्नाटकातून आल्यानंतर अडवून धरली.