१८ वर्षानीं एकत्र : कंठ दाटला … आठवणींचा बांध फुटला … उर भरला …. !
मुरगूड ( शशी दरेकर ) : १८ वर्षांनी शालेय जीवनातील सर्व मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. सर्वांची मी पणाची कवचकुंडले गळून पडली होती .प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या मैत्रिणींचा मग जुन्या आठवणींचा जणू बांधच फुटला . विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल च्या २००५ – २००६ च्या दहावीच्या त्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा जीवनातील एक आनंदमयी सोहळा ठरला.
मुरगुड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल च्या २००५ २००६ च्या दहावी विद्यार्थिंनीच्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ .एस एस भिऊंगडे होत्या. तर मुख्याध्यापिका श्रीमती एस बी पाटील ,माजी प्राचार्य महादेव कानकेकर, माजी मुख्याध्यापक एस एच पाटील , मुख्याध्यापक एम आय कांबळे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सर्व गुरुवर्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करून पाद्यपूजन करण्यात आले. गुरुवर्यांना मोमँटो व आभारपत्र देवुन चिरकाल आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे .यावेळी शिक्षक व विद्यार्थिनींनी मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मेळाव्यात कौंटुबिक व वैवाहिक जीवनात समरस झालेल्या या मुली स्नेह संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आल्या . मुलाबाळासह एकत्र आलेल्या या मैत्रिणी एकमेकाच्या सुखदुःखात कधी हरवून गेल्या कळलेच नाही .शालेय जीवनातील केलेल्या खोड्या, शाळेला मारलेली दांडी , शिक्षा, मैत्रिणींची उडवलेली टर तर शिक्षकांची केलेली फजिती या अशा असंख्य रम्य आठवणीत मग रंगून गेले सभागृह. मात्र त्या वेळची ही चिमुरडी आता विविध टप्प्यावर, कौंटुबिक व वैवाहिक जीवनात यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत.
यावेळी विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ. एस एस भिऊंगडे, मुख्याध्यापिका श्रीमती एस बी पाटील, शिवराज ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य महादेव कानकेकर, माजी मुख्याध्यापक एस एच पाटील, मुख्याध्यापक एम आय कांबळे, एस डी चौगले, डी आर लोखंडे, डी एम सागर, व्ही टी गायकवाड, संभाजी भोसले, सौ. विद्या धडाम, सौ. स्मिता देसाई, कलावती मेहतर, संजीवनी महाजन, शांताबाई कांबळे उपस्थित होते. यावेळी स्वागत प्रास्ताविक पूनम गोरुले ( राऊत )यांनी केले. पौणिमा माने हिने सूत्र संचालन केले. तर आभार प्रतीक्षा हावळ (वेल्हाळ) यांनी मानले.