मुरगूड (शशी दरेकर) – निढोरी ता.कागल येथे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील व अॅटवन्स कला,क्रीडा व सांस्कृतिक युवामंच निढोरी यांच्या संयोजनातुन गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
त्या ‘राजकारणाची दिशा व दशा (आपली संविधानात्मक जबाबदारी)’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा व्याख्यानाचा कार्यक्रम जेष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे अशी माहिती माजी सरपंच जयश्री देवानंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सौ.पाटील म्हणाल्या, सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील हे 1993 पासुन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आहेत.त्यांच्या 30 वर्षाच्या सामाजिक जीवनात त्यांनी 250 पेक्षा जास्त व्याख्याने आयोजित केली आहेत.
लोकसेवेचे व्रत घेऊन सार्वजनिक जीवनात प्रवेश केलेले देवानंद पाटील प्रत्येक वर्षी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित करतात. या वर्षीच्या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ढासळत चाललेला राजकारणाचा दर्जा आणि लोकशाही मूल्यांची होत असलेली घसरण विचारात घेवून ‘राजकारणाची दिशा व दशा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी परिवर्तनवादी चळवळीतील मुलुख मैदानी तोफ म्हणुन महाराष्ट्रभर प्रचलित असणार्या सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी गावचावडी पटांगणात सायंकाळी 6.00 वाजता संपन्न होत आहे तरी या व्याख्यानासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा व कृतीशील प्रबोधन चळवळीचा धागा व्हा असे आवाहन माजी सरपंच जयश्री पाटील यांनी केले.