पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथुन कुरणी व भडगांव या दोन्ही गावांना एकाच रस्त्याने जोडले आहे.हा रस्ता वेदगंगा नदीवरून जातो. या ठिकाणी बंधाऱ्याच्या सहाय्याने हा रस्ता जोडला गेला आहे.सध्या या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. पुलाच्या ठिकाणी खाचखळग्यांनी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे “खड्ड्यावर रस्ता आहे की रस्त्यावर खड्डे आहेत हेच समजत नाही”अशी कडवट प्रतिक्रिया नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडुन येत आहेत.
मुरगुडमधुन कुरणी, भडगाव, मळगे खुर्द, मळगे बुद्रुक तसेच कागलकडे ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने या रस्त्याचा वापर होतो.या भागातील विद्यार्थी शाळा, काॅलेजला येण्यासाठी सायकलने या रस्त्यावरून प्रवास करतात.
तसेच मंगळवारी आठवडा बाजारादिवशी या रस्त्यावर प्रवाशांची खुप वर्दळ असते.या रस्त्याने मुरगुडमधुन कागलला जाण्यासाठी कुरणी किंवा भडगाव मार्गे कागल रोडला जाता येते तसेच मुरगुड पंचक्रोशीतील अनेक गावांना जाण्यासाठी हा रस्ता उपयुक्त आहे.दिवसभरात हजारो प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करतात.विशेषतः या रस्त्यावरून दोन चाकी व चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.
या नदीपुलाच्या मुरगुडच्या बाजुला पुलापासुन 50 मीटरपेक्षा पण कमी अंतरावर दोन तीव्र वळणे लागतात त्यामुळे या पुलाजवळ अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.बऱ्याच वेळेस खराब रस्त्यामुळे आणि धोकादायक वळणामुळे होणारे जीवघेणे अपघात अंशतः टळले आहेत.यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
“या ठिकाणी जीवघेणा अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का?,एखादा जीवघेणा अपघात झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? “अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहेत.
रस्त्याबरोबरच नदीपुलाच्या दोन्ही बाजुला असणारे दोन-दोन फुट उंचीचे संरक्षक खांबसुद्धा कमकुवत झालेले आहेत. या ठिकाणी अपघात झाल्यास नदीपात्रात जाऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे संभाव्य धोके टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी यात लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची व पुलाची डागडुजी करून घ्यावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे नाहीतर प्रसंगी ‘रास्ता रोको’ करावा लागेल असा इशाराही काही प्रवासी देत आहेत.