मुरगूड ( शशी दरेकर ) – हुकुमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते. आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतीय नागरिकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून समाजवाद, धर्मनिरपेक्षता, संघराज्य यासारख्या महत्वाच्या मुल्यांचं अवमूल्यन सुरू आहे. भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही आघात होत आहे.
मुलभुत प्रश्नांना बगल देऊन जातीधर्मांच असंविधानिक राजकारण होत आहे.अशाप्रकारे देशामध्ये महात्मा गांधीजींचे नाव घेऊन नथुरामाचे काम सुरू आहे त्यामुळेच वर्तमानकाळ अस्वस्थ बनत आहे असं प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनी आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. अध्यक्षस्थानी अभियंता शाहु फर्नांडिस होते.
मुरगुड ता.कागल येथे समाजवादी प्रबोधिनी शाखा- मुरगुड यांच्या वतीने कोरोनाचा अपवाद वगळता सलग 34 वर्षे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित केली जाते.या 34 व्या व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प गुंफण्यासाठी प्रबोधन प्रकाश ज्योतीचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांना निमंत्रित केले होते.त्यांनी ‘भारतीय स्वातंत्र्य लढा,संविधान निर्मिती व सद्यस्थिती’ याविषयावर श्रोत्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रबोधिनीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर यांनी केले तर प्रास्ताविक सचिव समिर कटके यांनी केले.
यावेळी बोलताना कुलकर्णी पुढे म्हणाले,देशामध्ये मुल्य व्यवस्थेला तडे जात आहेत. भांडवलशाही वर्गाकडून सामाजिक व आर्थिक शोषण होत आहे त्यामुळे एक नवा साम्राज्यवाद रुजताना दिसत आहे अशावेळी विवेकाची व समतेची विचारधारा घेऊन चळवळ बळकट करण्याची गरज आहे.
यावेळी दलितमित्र डी.डी.चौगले, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, भिकाजी कांबळे, दलितमित्र एस.आर.बाईत, एकनाथराव देशमुख, जयवंत हावळ, एम.डी.रावण, सुनिल डेळेकर, राजू चव्हाण, प्रकाश तिराळे, सुरज कांबळे इत्यादी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विकास सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर बी. एस. खामकर यांनी आभार मानले.