बातमी

मुरगुडमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी

कुंभार गल्ली शेजारी नारळीच्या झाडावर कोसळली वीज, कोणतीही जिवीत हानी नाही

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता. कागल येथे सायंकाळी चारच्या सुमारास अचानक ढग भरून आले व ढगांचा गडगडाट सुरु झाला. थोड्या वेळाने सौम्य गतीने वारा वाहु लागला व जोरदार विजांचा कडकडाट होऊ लागला.विजांच्या कडकडाटाने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धांदल तर उडालीच शिवाय लोक भयभीत होवून आडोसा शोधु लागले. काही काळ सलग पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. अचानक गारवा निर्माण झाल्यामुळे दिवसभर उन्हामध्ये काम करताना त्रस्त झालेले मजुर सुखावले होते.

हवामान खात्याने गुरुवार पासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती.यावेळी कोल्हापूर जिल्ह्याला आॅरेंन्ज अलर्ट दाखवून प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळी चार च्या सुमारास मुरगुडमध्ये पावसाने हजेरी लावली. जोरदार विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली.

यावेळी मुरगुड येथील कुंभार गल्लीशेजारील अचानक नारळीच्या झाडावर वीज कोसळली. काही काळ नारळाचे झाड पेट घेत होते. पण अचानक पावसाच्या सरी चालू झाल्या व पेट घेणाऱ्या नारळाच्या झाडाने सुटकेचा निःश्वास सोडला. या दरम्यान नारळीच्या झाडाच्या परीसरात नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण नागरिकांमध्ये भितीदायक परिस्थिती निर्माण झाली होती.

आज दिवसभरात उन्हाचा तडाका होता.प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि सौम्य वारा वाहु लागला त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या अनेकांना उष्णतेपासुन उसंत मिळाली. आज अचानकच आलेला अवकाळी पाऊस हा या वर्षातील पहीलाच पाऊस आहे. त्यामुळे अनेकांनी या पावसाचे स्वागतही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *