कागल : गोरगरीब माणसाचे स्थान माझ्या हृदयात आहे. त्या गोरगरीब माणसांच्या तळमळीतूनच माझ्या हातून विधायक काम निर्माण झाले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील धनगर गल्लीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा संचासह अत्यावश्यक साहित्य व त्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अमर सनगर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, निराधार योजनेची पेन्शन जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत पोहचेल यासाठी लागू असलेली वार्षिक वीस हजार रुपये उत्पन्न मर्यादेची अट पन्नास हजार रुपये करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच लाभार्थीची मुले मोठी झाल्यानंतर बंद होणारी पेन्शनची अट काढून टाकावी लागेल आणि एक हजार रुपये पेन्शन दोन करणारच.
कागल शहराचे अधिपती अजितसिंह घाटगे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
मंत्री श्री. हसन मुश्रीफ भाषणात म्हणाले, थोर व महान पुरुषांच्या पुतळ्यामुळे कागलचे वैभव वाढतच आहे. लवकरच कागलचे अधिपती जूनियर अजितसिंह घाटगे महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कागल शहरात ऊभारणार आहे, असेही ते म्हणाले.
धनगर गल्लीमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व शिष्यवृत्तीचे वाटप
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागल शहरात विकास कामच शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधींचा निधी आणून कागल शहराचा कायापालट केलेला आहे. त्यांच्या प्रयत्नातून कागल शहरासाठी थेट काळमवाडीचे पाणी कागलच्या तलावात आणून सोडणाऱ्या कालव्याचे कामही लवकरच पूर्ण होत आहे.
प्रास्ताविकपर भाषणात माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, प्रभागात अमर सणगर व त्याच्या सहकाऱ्यांनी शासकीय योजना घराघरात पोचवून चांगले काम केले आहे, संपूर्ण कोरोणा संकटाच्या काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रात्रंदिवस रुग्णांना वाचवण्यासाठी झटत होते.
परंतु काही मात्र घरात लपून बसले होते. जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करू शकणार नाहीत, ते जनतेचे काय संरक्षण करणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. कोरोना काळात कुठे होता, हा जाबही त्यांना विचारा, असेही ते म्हणाले.
यावेळी पी.बी. घाटगे(सर), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, सौ. माधुरी मोरबाळे, रमेशराव माळी, रामचंद्र गोरडे, संजय चितारी, दिलीपराव जांभळे, विलासराव घाटगे, प्रवीण काळबर आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत अमर सनगर यांनी केले. सुत्रसंचलन विठ्ठल भोपळे यांनी केले.