संपादकीय

स्वतःचा भाऊ मुख्यमंत्री असताना राज ठाकरे यांचा खटाटोप कुणासाठी ?

मुसलमान समाजाचा वर्षातील मोठा सण ‘ईद’ चा असतो. या सणाच्या तोंडावर मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर दुप्पट आवाजात आम्ही मशिदी समोरच हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. देशात मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येच्या कितीतरी कमी आहे. अल्पसंख्याक  असलेल्या समाजाला बहुसंख्यांक असलेल्या लोकांनी धमक्या दयायला फार मोठा ‘पराक्रम’ लागत नाही. मुसलमानांना, परप्रांतीयाना धमक्या देवून  राज ठाकरेंचा पक्ष मोठा होण्याची सुतराम शक्यता नाही. पक्ष मोठा होण्यासाठी  पक्षाचा जाहीरनामा असावा लागतो. पक्षाचा नेता अभ्यासू, कार्यक्षम, शांत, ध्येयवादी, पक्षातील लोकांना घेऊन जाणारा, राष्ट्रप्रेमी, संविधान प्रेमी असावा लागतो. राज ठाकरे यांच्या पक्षाचा राष्ट्र उभारणीचा कोणताच कार्यक्रम दिसत नाही. काही वाद निर्माण करायचे, लोकांची डोकी भडकावयाची, समाजात भांडणे लावायची आणि सत्ता येते का हा प्रयोग करायचा. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे.

स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान केलेल्या क्रांतीकारांचा आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणाऱ्या येथील कर्तबगार नेत्यांचा आहे. महाराष्ट्र कायम स्वबळावर उभा आहे आणि क्रांतीकारकानी, समाजसुधारकानी आणि संत महात्म्यांनी त्यांच्या कष्टातून, त्यागातून आणि रक्तातून उभा राहिलेला हा महाराष्ट्र आहे. कोणीही उठावे, लोकांची डोकी भडकवावीत आणि सत्तेवर यावे असे येथे कधीच घडलेले नाही. इथला मतदार शहाणा आहे. राज्याचे वाटोळे करणाऱ्या व्यवस्थेला त्याने कधीच मतदान केले नाही. राज ठाकरेंच्या सभेला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतील पण राज ठाकरेना मते कधीच देणार नाहीत. हा अनुभव राज ठाकरे यांनी अनेक वेळा अनुभवला आहे. विधानसभेचे २८८ व विधान परिषदेचे ७८ असे मिळून ३६६ आमदार निवडून जातात. यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचा फक्त एक प्रतिनिधी निवडून गेला आहे हे मोठे दुर्दैव्य आहे. याचे ठाकरेंना काहीच वाटत नाही. महाराष्ट्रातील महानगरपालिके मध्ये पाच पंचवीस नगर असावेत. एवढ्या तुटपुंज्या लोकप्रतिनिधीवर ते महाराष्ट्रात सत्तेत कसे येणार ?  सत्तेत आल्याशिवाय लोकांचा विकास करता येत नाही हे माहीत असूनही राज ठाकरे इतका त्रास कशासाठी घेतात.

महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली माती कोण्या येरागबाळयाला कधीच स्वीकारणार नाही. समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  या समाजसुधारकांनी महाराष्ट्रातील जातीभेद, वर्णभेद  स्त्री-पुरुष भेदभाव मोडून काढले आहेत. त्यांनी अनिष्ट रूढी, परंपरा, अस्पृश्यता मोडून काढून मानवता धर्म रुजवला आहे. त्यामुळे जातिवाद्यांना या महाराष्ट्रात कधीच थारा दिलेला नाही. त्यामुळे जाती-जातीमध्ये भांडणे लावून त्यांच्या आस्मितेचे, कळीचे प्रश्न काढून, भाडोत्री प्रसार माध्यमांना बरोबर घेऊन सत्तेवर येण्याची कोणी स्वप्ने पहात असेल तर ते त्यांनी डोक्यातून काढून टाकावे. आपल्या सभेना तुफान गर्दी होते पण आपल्या पक्षाला मते मिळत नाहीत हे सन्मानीय राज साहेबांना माहीत असूनही हा कारभार ते कुणासाठी करीत आहेत हे त्यांचे त्यांनाच माहीत. त्यांच्या बोलवता धनी भारतीय जनता पक्ष आहे हे आता उघड झाले आहे. महाराष्ट्रात भाजपा सत्तेतून बाहेर गेल्यापासून त्यांच्या नेत्यांचा मोठा थयथयाट चालला आहे. त्यांचे नेते बेताल बोलत आहेत. विरोधी पक्ष कसा असावा हे त्याने विधानसभा, विधान परिषदेचा इतिहास वाचावा. त्यांनी एस.एम.जोशी, शरद पवार, यशवंतराव चव्हाण, गणपतराव देशमुख, दि.बा.पाटील, एन.डी.पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या कर्तबगारीचा आणि नैतिकतेचा अभ्यास करावा. विरोधात असूनही त्यांनी कटुता कधीच आणली नाही. भाजपचे नेते सूडाने पेटल्यासारखे बोलत आहेत. वीस वर्ष आपण  शिवसेनेबरोबर होतो. राज्यांचा कारभार करताना आपल्यालाही हातून बऱ्या-वाईट गोष्टी घडल्या आहेत याचे भान या लोकांना राहिलेले दिसत नाही. राज ठाकरे सारख्या माणसाला पुढे करून सत्ताधारी मंडळींना त्रास देताना भाजपला तुर्त बरे वाटत असेल पण अशा तापट स्वभावाच्या नेत्याबरोबर युती करताना अवघड जाणार आहे.  

                      राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न कोणत्या पार्श्‍वभूमीवर काढला याचा आपण विचार करू. सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न जटील झाले आहेत. आर्थिक प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. नियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार देण्याचे आश्वासन या सरकारने दिले आहे हे खरे आहे. त्यांना ते पैसे शेतकऱ्यांना देता येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारची जी.एस.टी.ची रक्कम केंद्रात अडवून ठेवणे हे बरे नाही. हा केंद्राचा कुचकटपणा आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. अनेक लोक कोरोनाला बळी पडले. दवाखाने अपुरे पडावेत तितक्या लोकांना कोरोनाचा आजार झाला. अनेक लोकांचा मृत्यू झाला. गरीब लोकांना पैसे नसल्याने उपचार मिळाले नाहीत. काही लोकांनी आहे ती सर्व शेतीवाडी विकून उपचार करून घेतले. जीव वाचविण्यासाठी लोकांनी नातीगोती तोडली. आपल्याला कोरोना होईल या भीतीने घरातील बाप, भाऊ, बहिणी, पत्नी कोरोना पेशंट जवळ जात नव्हते. जीव वाचविण्यासाठी लोकांनी जन्माजन्माची नातीगोती तोडली. कुटुंब व्यवस्थेच्या नैतिकतेला तडा बसला. नातीगोती उद्ध्वस्त झाली. अशा अवस्थेमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने प्रयत्नाची पराकाष्टा करून अनेक लोकांचे प्राण वाचविले. सरकार लोकांच्या मदतीसाठी धावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचे सारखा शांत डोक्याचा माणूस लोकांच्या मदतीला देवासारखा धावला.

शासनाची सर्व शक्ती पणाला लावून लोकांचे जीव वाचवले. त्यांना मंत्री राजेश टोपे यांच्यासारखा शांत डोक्याचा व अतिशय कर्तबगार आरोग्यमंत्री मिळाला. या दोन दिग्गज माणसांनी महाराष्ट्राची सारी यंत्रणा पणाला लावून संपूर्ण महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. पोलीस खाते, आरोग्य खाते, अर्थखाते,  ग्रामीण विकास खाते यांना विश्वासात घेऊन माणसांना विश्वास दिला. या घडामोडींमध्ये केंद्राने मात्र घाणेरडे राजकारण केले. महाराष्ट्राला चांगली वागणूक दिली नाही. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्राला लोकांचे कडून याचे उत्तर मिळेल. कोरोना बरोबर महापुराचे मोठे संकट दोन वर्षात आले. लोकांची घरेदारे वाहून गेली. लोक बेघर झाले. अशा अवस्थेत मुख्यमंत्रीपदी बसलेला ‘वाघ’ डगमगला नाही. लोकांना दिलासा दिला. त्यांना मार्गदर्शन करणारा लोकनेते शरदराव पवार यांच्यासारखा अनुभवी खमक्या नेता लाभला. त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांची लोकप्रियता घराघरात पोहचवली. उद्धव ठाकरे यांचा नम्रपणा, काम करण्याची चिकाटी, आकांडतांडव न करता शांत डोक्याने काम करण्याची पद्धत लोकांना आवडली. लोकांचा आवडता मुख्यमंत्री झाला. उद्धवजींची लोकप्रियता हेच भारतीय जनता पक्षाचे व राज ठाकरेंचे खरे दुखणे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा थयथयाट आणि राज ठाकरे यांचा खटाटोप याला उद्धव ठाकरे यांची लोकप्रियताच कारणीभूत आहे. राज ठाकरे यांची कर्तबगारी काय असा असा सबंध महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.एखादी संस्था नाही, कुठे बँक नाही, साखर कारखाना नाही, सुतगिरण नाही, दूध संघ नाही, साधी सोसायटी किंवा भिशी नाही तरीही हा माणूस राज्याची सत्ता घ्यायला निघालाय. लोकांच्या भावनेवर बसून पुरोगामी महाराष्ट्रात राज्याची सत्ता येत नाही. राज ठाकरे यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. फक्त भडक  भाषणे करायची. राजकारणात लोकांची सेवा करावी लागते. लोकांची घरेदारे उभी करावी लागतात तरच लोक स्विकारतात.  

                          मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकाच घरात जन्माला आलेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीवर बसून दोघेही लहानाचे मोठे झालेत. बाळासाहेबांनी आपल्या राजकीय जीवनात कधीच निवडणूक लढविली नाही. त्यामुळे ते कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत. उद्धवजींच्या रूपाने ठाकरे कुटुंबाला हे राज्याचे प्रमुखपद सत्तर  वर्षानंतर मिळाले आहे. याचा आनंदच राज ठाकरेना व्हायला पाहिजे होता. स्वतःच्या भावाला मुख्यमंत्री पदावरून घालवून राष्ट्र ठाकरेना काय मिळणार आहे. ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत ही  काळ्या दगडावरील रेघ आहे. हे समजत असतानाही ते उद्धवजींच्या मागे का लागले आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. राज ठाकरेंनी आपला भाऊ उद्धवजी ठाकरे सत्तेवर असताना निदान शांत बसण्याचे तरी काम करावे अशी तमाम महाराष्ट्रीयनांची इच्छा आहे. कुचकट लोकांचे ऐकण्यापेक्षा स्वतःचा शांत डोक्याने राजकारण करावे व महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे घराण्याचे नाव उज्वल करावे. अन्यथा काळ राज ठाकरेना माफ करणार नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *