मुरगूड ( शशी दरेकर ): सत्यवानाचे प्राण वाचवण्याची पौराणिक महत्ती असणाऱ्या वटपौर्णिमेदिवशी एका हिरकणीने दुसऱ्या माऊलीच्या मुलाचे प्राण वाचवण्याचे धाडस केवळ असामान्य आणि गौरवास्पद’ असे मत प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले. या कामगिरीचे माहेरच्या लोकांनी केलेले कौतुक पाहून कृतार्थ झाल्याची भावना त्या माऊलीने व्यक्त केली. सौ. माया सुभाष साठे रा. कसबा वाळवे ता. राधानगरी असे रणरागिणीचे गांव आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून दिले दुसऱ्याच्या लेकराला जीवदान
ती अवचितवाडी ता.कागल येथील महादेव शंकर गायकवाड यांची मुलगी. अवचितवाडी ता.कागल येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये स्वराज्य निर्माणचे संस्थापक संदिप बोटे यांच्या पुढाकाराने हा माहेरवासिनीच्या सन्मानाचा सोहळा नुकताच झाला.
सौ. माया साठे यांची माहेरगांव अवचितवाडीत सवाद्य मिरवणूक आणि सन्मान
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार होते. वटपौर्णिमेच्या दिवशी वडपूजेसाठी कोमल भाट या विनायक आणि हर्षवर्धन या दोन मुलांना घेऊन अन्य महिलां समवेत गेल्या होत्या.वय वर्षे चार असणारा हर्षवर्धन खेळण्याच्या उद्देशाने नदीमध्ये उतरला. दरम्यान सौ. माया साठे घाटावर कपडे धूत असताना त्यांना लहान मुलाची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसले. शंका येवून नदीच्या पात्रात नजर फिरवली त्यावेळी त्यांना नदीच्या मध्यभागी पाण्यावर एक पाय आल्याचे त्यांनी पाहिले.
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नदीत उडी टाकून बुडणाऱ्या मुलाला धरून काठावर आणले. त्याच्या पोटातील पाणी काढून त्याला शुद्धीवर आणले. त्यामुळे हर्षवर्धनला जीवदान मिळाले. सौ. साठे यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करताना स्वतःच्या मुलासाठी रायगड किल्यावरील उभ्या कडावरून रात्रीच्या वेळेस खाली उतरणाऱ्या हिरकणीची आठवण अनेकांना झाली आणि हाच धागा पकडत अवचितवाडीकरांनी माया साठे यांचा नामोल्लेख हिरकणी या टोपण नावाने करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संदिप बोटे यांनी व सुत्रसंचालन विकास सावंत यांनी तर आभार कृष्णात कापसे यांनी केले. कार्यक्रमासाठी वाळवेचे रामराव इंगळे, भगवान पाटील, एस पी पाटील अवचितवाडी मा.ग्रा.पं.सदस्य शिवाजी भारमल, युवराज सुतार यांच्यासह साताप्पा पाटील राजेंद्र भोसले गावातील महिला, लहान मुले-मुली उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.