संपादकीय

सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले

हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्‍या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्‍या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन गुरुंचे विचार घेऊन बाबासाहेबांनी संघर्ष केला. बाबासाहेब जगन्मान्य झाले. अशा महान व्यक्तीने फुले यांना गुरुस्थानी मानावे यातच फुले यांचे मोठेपण आहे. लोक महात्मा फुले यांना आदराने तात्यासाहेब असे म्हणत. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचा संदेश घेऊन अनेक समाजसूधारकांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांनी इतिहास घडविला. मातंग समाजातील मुक्ता साळवी यांनी आपल्या निबंधातून ब्राम्हणी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारले. मराठा समाजातील ताराबाई शिंदे (बुलढाणा) या विधवा महिलेने आपल्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातुन पुरूषी संस्कृतीचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. ताराबाई शिंदे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बापूजी हरी शिंदे यांची कन्या होत. म. फुले यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन रमाबाई यांनी स्वधर्मातील कर्मकाडांवर लेखणी चालविली. रमाबाई ब्राम्हण समाजाच्या होत्या. रामोशी म्हणून म. फुले यांचा खून करण्याची सुपारी घेऊन आलेला धोंडिराम कुंभार संस्कृतचा पंडीत झाला. लोकांनी त्यांना संस्कृतमधील शास्त्री ही पदवी दिली. वैष्णव कुळातील हैद्राबादचे रामय्या व्यंकय्या आयावरु, तेलगु भाषिक जया यल्लाप्पा लिंगू, गवळी समाजाचे डॉ. विश्राम रामजी घोले, मोठे व्यापारी असलेले रामचंद्र बापूशेठ उरवणे, भंडारी जातीचे तुकारामतात्या पडवळ, माळी समाजाचे नारायण मेघाजी लोखंडे आणि कृष्णाजी पांडुरंग भालेकर अशा अनेक समाजसुधारकानी महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार स्विकारला. ही मंडळी अनेक जाती धर्मातील होती. या मंडळीनी सर्व क्षेत्रामध्ये क्रांतीकारक काम केले. पत्रकारिता, ग्रंथलेखन, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, स्त्री मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, शिक्षण अशा अनेक अंगानी काम करुन या मंडळीनी समाज सदृढ केला. जोतिरावानी सामाजिक कार्यकर्त्यांची फौजच उभा केली असे म्हणावयास कांही हरकत नाही. या कामात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी भरीव योगदान दिले.

जोतिबाचे पुर्वज सातारा जिल्ह्यातील कटगुण या खेड्यातील, त्यांचे पणजोबा कोंडाजी एक सज्जन गृहस्थ होते. त्यांचे अगोदरचे आडनाव गोर्‍हे होते. फुले आडनाव पुण्यात आल्या नंतर पडले. कोंडाजी गोर्‍हे गांवचे चौगुले या बाराबलुतेदारापैकी होते. सरकारी दप्तराची ने-आण करणे, शेतसारा, वसुलीत पाटील व कुलकर्णी यांना मदत करणे अशी कामे त्यांना करावी लागत. कोंडाजीना शेटीबा नांवाचा मुलगा झाला. शेटीबाना कृष्णा, राणोजी आणि गोंविंदराव अशी तीन मुले, गोंविंदराव हे म.फुलेंचे वडील, गोविंदरावानी पुण्याजवळील धनकवडी येथील झगडे पाटील नावाच्या माळी जातीतील चिमण्या यांच्याशी विवाह केला. गोविंदा चिमणाबाईस दोन पुत्ररत्न झाले. मोठा राजाराम आणि लहान जोती. जोतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली पुण्यात झाला.जोतीच्या जन्माच्यावेळी फूले कुटुंब हार व फूलांचा व्यापार करण्यासाठी पुण्यात होते. पेशवे दरबारात हार आणि फूले पुरविण्याचे काम फूले कुटुंबाला मिळाले होते.

पुण्यामध्ये जोतिबांचे कुटुंब पेशवे दरबारी लोकप्रिय झाले. त्यांच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन पेशव्यांनी फुले कुटूंबाला 35 एकर जमीन बक्षिस दिली. दरबारात फूले पुरविणे व बागकाम करणे यामुळे त्यांना गोर्‍हे ऐवजी फुले असे संबोधले जात असे. त्यामुळे त्यांना फुले आडनाव मिळाले. जोतिबांचे वडील गोविंदराव यांनी पेशवाई जवळून पाहिली होती. गोंविंदराव यांनी रामचा वारसा सांगणारे पेशवे जातियवादी झाले होते. पेशवाईत सामान्य शुद्र माणसांच्यावर होणारे अन्याय अत्याचार गोविंदराव डोळ्यांनी पहात होती. पेशवे चंगळवादी जीवन जगत होते. पेशव्यांचा फक्त, ब्राम्हणांना खुष ठेवण्याच्या प्रयत्न चालला होता. ब्राम्हणांना योग्यता न पहाता पदांची खिरापत, मोठा दान धर्म करणे, दक्षिणांना पाऊस पाडला जात असे. या काळात जेवणावळी सतत झडत असत. शेतकर्‍यांच्या करातून सर्व खर्च केला जाई. सावकारकीसुद्धा ब्राम्हण जातीकडे होती. त्यामुळे थकीत कर्जासाठी गरीब शेतकर्‍यांनी शेती गुरेढोरे लिलाव काढला जाई. त्यामुळे सामान्य माणूस असहाय्य स्थितीत जीवन जगत होता. हे अन्याय अत्याचार संपले पाहिजेत असे गोविंदरावाना वाटत असे. पेशवाई गेली आणि इंग्रजी सत्ता आली. लोकांना पेशवाई पेक्षा इंग्रजी सत्ता जवळची वाटू लागली. मुलगा जोतिबाला शिकविण्याचा निर्णय गोविंदरावानी घेतला. जोतिबांना शिक्षणाची संधी मिळाली. शिक्षण झाल्यावर जोतिबांनी समाजसुधारणेचे काम हाती घेतले. जन्मभर ते निष्ठेने केले. जोतिबा सामान्य कष्ट करणार्‍या माणसाच्या गळ्यातील ताईत झाले. लोकांनी उत्स्फुर्तपणे त्यांना महात्मा ही पदवी दिली. अशा या महात्म्याला सविनय अभिवादन….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *