ताज्या घडामोडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या!: नाना पटोले 

मुंबई, दि. ९ एप्रिल २०२२ :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक न्यायाची स्थापना केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या याच सामाजिक न्यायाची भूमिका नंतर संविधानात घेतली. अमेरिकेनेही त्याच धर्तीवर सकारात्मक कृती योजनेच्या माध्यमातून ती राबवली. याचा सर्वांगिण विचार करता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी नाना पटोले कोल्हापूरमध्ये आले असता त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जगात आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर विभाजन होत आहे. सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. या खाजगीकरणामुळे बहुजन समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता धोक्यात आलेली आहे, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.  त्यामुळे सामाजिक न्यायाची सुरुवात ज्या भूमीतून झाली आणि नंतर ती देशात व जगभरात पोहचली त्या भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला पाहिजे. हे स्मारक कोणतेही सरकार आले तरी त्यांना नेहमी जाणीव करू देत राहिल की शोषित, वंचित घटकाच्या हक्कांवर कधी गदा आली नाही पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा ही मागणी काँग्रेस पक्ष कायम रेटून धरेल आणि हे राष्ट्रीय स्मारक होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहू असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.  

सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा व प्रत्येक व्यक्ती समान असावी यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या संस्थानात अनेक क्रांतीकारक निर्णय घेतले. दलित व मागासवर्गीयांसाठी मोफत व सक्तीचे शालेय शिक्षण सुरु केले. नोकरीत मागासलेल्या जाती जमातींच्या लोकांसाठी ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन तो शाहू महाराजांनी अंमलात आणला. राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. अशा थोर लोककल्याणकारी राजाच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिल्यास येणाऱ्या पिढ्यांना ते प्रेरणा देणारे ठरेल असेही पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *