बातमी

श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे पौर्णिमेचा प्रवचनाचा कार्यक्रम पूर्ववत प्रारंभ होणार

आडी(राजकुमार पाटील) : आडी (ता. निपाणी) येथील संजीवन गिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने प्रत्येक पौर्णिमेला होणारा परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. असे देवस्थान कमिटी कडून कळविण्यात आले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्यातील अगणित भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदत्त देवस्थान मठ, आडी येथे प. पू. परमात्मराज महाराजांच्या प्रवचनाचे कार्यक्रम पुन्हा सुरू व्हावेत, अशी भाविकांची तीव्र इच्छा आहे. कोरोना महामारीमुळे बरोबर दोन वर्षे पौर्णिमेचे कार्यक्रम बंद होते. परन्तु केन्द्रशासन व विविध राज्य सरकारांनी १ एप्रिल २०२२ पासून प्रायः सर्वत्र कोरोनाविषयक निर्बन्ध हटविल्यामुळे नियमानुसार कार्यक्रम सुरू करण्याला कुठलीही अडचण राहिलेली नाही.

आता चैत्र पौर्णिमा दि. १६ एप्रिल २०२२ ला कोरोना महामारीनंतरचा पहिला पौर्णिमा कार्यक्रम होईल. पूर्वीप्रमाणेच परमपूज्य परमात्मराज महाराजांचे सायंकाळी साडेसात ला प्रवचन सुरू होईल. प्रवचन झाल्यावर महाप्रसाद होईल.

कोरोना महामारी कालखंडातील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या दरम्यान मंदिर बंद होते. तीव्र लाट नसताना मंदिर भाविकांसाठी खुले होते. परन्तु पौर्णिमेचे कार्यक्रम मात्र सम्पूर्ण दोन वर्षेपर्यन्त बंदच राहिलेत. आता दर महिन्यातील पौर्णिमेचे उत्सव सुरू होत असल्यामुळे भाविकांना उत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

कोरोना महामारी काळात प. पू. परमात्मराज महाराजांनी सिध्रेण व रस्याव ग्रंथ लिहिले व प्रकाशित केले.त्या ग्रंथांनाही भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीच्या काळात कोगनोळी फाट्यावर तसेच अनेक गावातून सुरक्षा व्यवस्था बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व्यवस्थेला राहण्यासाठी सर्वेज्य संस्कृतिक भवनात सोय करून देवस्थान ने सामाजिक बांधिलकी जतन केली.

गेल्या सहा महिन्यांपासून प. पू. परमात्मराज महाराजांची मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमधील प्रवचने यूट्यूब वरून प्रसारित करण्यात आली आहेत. त्या प्रवचनांचा लाभही विविध भाषिक भाविकांना झाला आहे. ज्यांना मराठी भाषा समजत नाही त्यांनाही महाराजांच्या हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रवचनांचा लाभ घेता आला आहे.

यूट्यूबवरील महाराजांच्या प्रवचनांची शतकपूर्ती लवकरच होईल. प्रवचनांचे शतक पूर्ण व्हायला फक्त दोन – तीन प्रवचने बाकी आहेत. ऑनलाईन प्रवचनशतक पूर्ण होईलच. परन्तु पौर्णिमेला महाराजांचे प्रत्यक्ष प्रवचन ऐकायला मिळावे, अशी भाविकांची इच्छा असल्यामुळे पौर्णिमेचे कार्यक्रम सुरू होत असल्याबद्दल सर्व भाविकांमध्ये अत्यन्त उत्साह दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *