बातमी

जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर : जिल्ह्यात दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत हागणदारी मुक्त अधिक गाव या विषयावर जिल्हास्तरीय सरपंच संवाद कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, दि.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सेवा पंधरवडयामध्ये ग्राम पंचायतस्तरावर परिसर स्वच्छता करावी. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्राम पंचायतीवर भार न देता घरगुती स्तरावर उपाययोजना कराव्यात तसेच प्लास्टीक कचरा व्यवस्थापनासाठी गावस्तरावर जाळीचे पिंजरे ठेवण्यात यावेत आणि प्लास्टीक कच-याचे व्यवस्थापन करावे. यासोबतचं गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर गावाची स्वच्छता आणि पर्यावरण याचा प्राधान्याने विचार करून विकास आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी. तसेच सर्व गावांनी हागणदारी मुक्त अधिक निकष पुर्ण करुन मार्च २०२३ अखेर सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक घोषित करावीत असे आवाहन कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व सरपंचांना केले.

या कार्यशाळेत युनिसेफचे राज्य स्वच्छता सल्लागार जयंत देशपांडे यांनी हागणदारीमुक्त अधिक गाव संकल्पना, घटक व प्रक्रिया या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन याबाबत ही मार्गदर्शन केले. तसेच जिल्हयामध्ये बायोगॅस प्रकल्पाव्दारे मैला गाळ व्यवस्थापनाचे काम हे अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रियदर्शिनी मोरे यांनी केले. यावेळी अरुण जाधव, अशोक धोंगे, तालुकास्तरावरून सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत स्तरावरून सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, जलसुरक्षक असे सुमारे २८४२७ ऑनलाईनव्दारे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *