कागल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशाचे पालन करत कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२० पैकी १०३ परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत.
उर्वरीत २७ लोकांनी आपली शस्त्रे वेळेत पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे. कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २७ गावांतील १२० नागरिकांनी स्वसंरक्षणाकरिता विविध प्रकारच्या बंदुका जवळ बाळगल्या आहेत. यासाठीचा लागणारा शासकीय परवाना संबंधितांनी घेतला आहे.
यामध्ये काही व्यावसायिक, राजकीय कार्यकर्ते आणि आणि माजी सैनिकांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या परवानाधारक शस्त्रधारकांना आपली शस्त्रे स्वतःहून पोलिस ठाण्यात जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच बजावला होता.