बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे आय-पास प्रणालीवर त्वरित सादर करावेत – प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सर्व विभागाकडून विविध विकास कामासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले जातात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे सादर करताना यंत्रणांनी संगणकीय आय-पास(I-PASS) प्रणालीवर त्वरित सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपवन संरक्षक जी. गुरुप्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कायर्कारी अभियंता (विशेष प्रकल्प) संजय काटकर, कार्यकारी अभियंता (दक्षिण) प्रवीण जाधव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. पवार, यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे तसेच निधी मागणीचे प्रस्ताव व प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र हे संगणकीय आय-पास प्रणालीवर 20 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत सादर करावेत. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या विविध विषय, मागण्या व प्रश्नाबाबत संबंधित विभागांनी स्पष्ट व अद्यावत अनुपालन अहवाल नियोजन समितीकडे त्वरित सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्याप्रमाणेच सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मध्ये 425 कोटीच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. यापैकी 166 कोटीच्या आलेल्या विविध प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून अन्य सर्व संबंधित विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठीचे त्वरित प्रस्ताव सादर करावेत. व ज्या शासकीय यंत्रणांना पुनर्नियोजन अंतर्गत निधीची आवश्यकता आहे त्या यंत्रणांनी ही त्वरित नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवावेत, असेही श्री. शिंदे यांनी सुचित केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी नियोजन समितीच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 अंतर्गत विविध विभागांना मंजूर असलेला व वितरीत करण्यात आलेल्या निधीची माहिती दिली. तसेच सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना आयपास प्रणालीवर कशा पद्धतीने आराखडे व उपयोगिता प्रमाणपत्र अपलोड करावेत, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *