अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार – प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर :- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून अल्पसंख्याक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर चिटणीस संतोष कणसे, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे, जिल्हा मुस्लीम बोर्डिंगचे संचालक रफिक हा. शेख, वायल्डर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आनंद म्हांळुगेगर, महाविर महाविद्यालयाचे चेअरमन ॲड.के.कापसे, वीर सेवादलचे अल्पसंख्याक अध्यक्ष अनिल गडकरी, हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते सिंकदर शौकतअली, विनय हुक्केरी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
प्र. जिल्हाधिकारी श्री. शिंदे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे. अल्पसंख्याक समाजातील एक ही लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच अल्पसंख्याक समाजासाठी कार्यरत असलेल्या सर्व संघटनांनी त्यांच्या समाजासाठी असलेल्या याबाबतचे प्रबोधन प्रत्येक घटकापर्यंत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
त्याप्रमाणेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु काही मागण्या शासनाकडून सोडविणे आवश्यक आहे, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचीही माहिती श्री. शिंदे यांनी दिली. अल्पसंख्याक दिनानिमित्त अल्पसंख्याक समाजातील सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा देऊन प्रशासनाच्या वतीने शासकीय योजनेचा लाभ त्वरित देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी अल्पसंख्याक समाजातील संघटनेच्या प्रतिनिधींनी शासन व प्रशासनाच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव होण्यासाठी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती श्री. कणसे यांनी प्रास्ताविकात दिली. प्रशासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेची माहिती त्यांनी सादर केली.
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उदय कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अल्पसंख्याकासाठी शैक्षणिक तसेच व्यावसायिक शासकीय योजनांची माहिती दिली.
यावेळी उपस्थित अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे अल्पसंख्याक समाजाच्या अशासकीय सदस्यांच्या नेमणुका व मागण्याबाबत निवेदन सादर करून शासन दरबारी पाठपुरावा करून प्रशासनामार्फत दर तिमाहीत याचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अप्पर चिटणीस संतोष कणसे यांनी केले.