बातमी

आ. मुश्रीफ यांनी दिला आरोग्य सेवेचे काम करून लाखो कुटुंबांना आधार

कागल(विक्रांत कोरे): गेल्या पंचवीस वर्षापासून गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचे व्रत घेतले आहे. त्यातून लाखोंच्या मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. भविष्यातही हे काम अव्याहतपणे सुरू राहील. असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आरोग्य सेवेच्या सेवा यात्रींच्या सत्कार समारंभात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने होते.

यावेळी मुरगूड माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, नवीद मुश्रीफ, प्रकाश गाडेकर, शितल फराकटे, पद्मजा भालबर, नारायण पाटील, बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रुग्ण नातेवाईकांच्या वतीने मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपचार झालेले रुग्ण व संबंधित असणारे सर्व डॉक्टर्स यांचा सत्कार करण्यात आला.

श्री मुश्रीफ म्हणाले, माझ्या मंत्रिपदाच्या काळात रुग्णांवर उपचाराबाबत कायद्यात बदल केला. त्यामुळे राज्यातील लाखो लोकांच्या वर मोफत उपचाराचे काम झाले आहे. आयुष्यमान भारत कार्ड या योजनेच्या माध्यमातून कागल मतदारसंघामध्ये सर्वोच्च काम झाले आहे.

भैय्या माने म्हणाले, आमदार मुश्रीफ यांनी आरोग्य सेवेचे काम करून लाखो कुटुंबांना आधार दिला आहे. त्यामुळे गोरगरिबांचे भक्कम कवच मुश्रीफ यांच्या भोवती आहे. त्यांना कोणताही धक्का लागणार नाही. जो लढतो त्याच्याविरुद्ध षडयंत्र रचले जाते. हे दुर्दैवी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या, आमदार हसन मुश्रीफ नेहमीच गोरगरिबांच्या सेवेचे पुण्याईची काम करीत आलेले आहेत. सत्वपरीक्षा नेहमी चांगल्याची आणि सच्चाईचीच होत असते, हा इतिहास आहे.

प्रकाश गाडेकर यांनी गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचे मुश्रीफ हेच रुग्णसेवेचे हॉस्पिटल आहे. असे सांगितले. यावेळी प्रवीण काळबर, विकास शिंदे, डॉ. जीवन शिंदे यांच्यासह गीतांजली कांबळे (इचलकरंजी ), बळवंत तिप्पे (तमनाकवाडा ), कलेश्वर नेर्लेकर (नवे पारगाव ), शुभांगी आयरेकर (कोल्हापूर)आदी आपले अनुभव सांगत अश्रु अनावर झाले.

स्वागत संजय चितारी व प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. तर आभार पद्मजा भालबर यांनी मानले. कार्यक्रमास नाविद मुश्रीफ, डॉ.आयेशा राऊत, सूर्यकांत पाटील ,अस्लम मुजावर, सुनिल माळी,संजय फराकटे व राष्ट्रवादी प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुश्रीफांना अश्रू अनावर………
भाषणात आ. मुश्रीफ म्हणाले, नऊ वर्षाच्या एका लहान मुलाला दुर्धर असा हृदयरोग झाला होता. शस्त्रक्रिया करण्यासाठी जायचे म्हटले की तो घरातून घाबरून पळून जायचा. त्याचे आई-वडील त्याला समजावून सांगा म्हणून माझ्याकडे घेवून आले. तो चिमुकला म्हणाला, “साहेब, ऑपरेशनवेळी माझ्यासोबत तुम्ही थांबणार असाल तरच मी ऑपरेशन करून घेणार. मीही त्याला ऑपरेशनवेळी तुझ्याबरोबर थांबतो, असा शब्द दिला. दुर्दैवाने त्याच दिवशी ईडीची सुनावणी होती. मी थांबू शकलो नाही, असे सांगतानाच श्री. मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. मुंबईतील रिलायन्स ग्रुपच्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होऊन आज तो चिमुकला ठणठणीत बरा झाला आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *