संपादकीय

ईडीचे आरोप असलेले नेते घेऊन फिरण्यात कसला पराक्रम

सध्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप, आरएसएस, राज्यपाल, ईडी व सत्ता असा सामना चालला आहे. उद्धव ठाकरे पाच शत्रू बरोबर एकटे लढताना दिसतात. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी युती असताना काँग्रेस व राष्ट्रवादी या चाललेल्या भांडणात काही बोलत नाहीत. सारेच मूग गिळून बसले आहेत. सत्ता तिघा पक्षांनी भोगली पण अडचणीत शिवसेना एकटी सापडली आहे. शिवसेनेचा महत्त्वाचा मोहरा संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते काही बोलत नाहीत. गंभीर आजारातून उठलेल्या उद्धव ठाकरे यांना थोडी विश्रांती सुद्धा घेता आली नाही. ठाकरे घाबरले नाहीत. ते फार धाडसी आहेत. बोलतात कमी पण विचार खंबीर असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा झाली आहे. कोविड काळात त्यांनी व आरोग्यमंत्री टोपे यांनी केलेल्या कामगिरीला तोड नाही. त्यांनी अनेक माणसांचे जीव वाचवले. सारा महाराष्ट्र मुख्यमंत्री ठाकरे यांना धन्यवाद देताना दिसला. शिवसेनेतून चाळीस आमदार व बारा खासदार शिंदे गटामध्ये गेले. पण हा शिवसेनेचा वाघ घाबरला नाही. राहिलेले मावळे घेऊन निर्धाराने आणि धाडसाने ठाकरे लढताना दिसतात. 62 वर्षाचे ठाकरे भाजपबरोबर एकाकी लढत आहेत. आजोबा प्रबोधनकार ठाकरे (केशव सीताराम ठाकरे) व वडील बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्ध वारसा उद्धव ठाकरे यांना लाभला आहे. स्वर्गीय बाळासाहेब तर सारा भारत अंगावर घ्यायला कधी घाबरले नाहीत. बाळासाहेब निर्भीड व आक्रमक नेते होते. बाळासाहेब एकदा बोलले की वज्रलेपच. त्याचे चांगले, वाईट जे काही परिणाम होतील ते या माणसाची भोगायची तयारी असायची. इन्कार किंवा खुलासा वगैरे भानगडी ते कधी करीत नसत. त्यांचे विचार, त्यांचे बोलणे हे बावन्नकशी ठाम असायचे. बाळासाहेबांचा शिवसेनेच्या वाटचालीचा इतिहास ठाम व योग्य दिशेने होता. ते बोलताना कधी संधिग्धता ठेवीत नसत. जे अंतकरणात आहे ते स्पष्ट मांडायचे. इतर पुढार्‍यांसारखे ढोंगीपणा, नाटकीपणा, खोटा अभिनय करून सांगणे हा प्रकार त्यांच्या जीवनात कधीच झाला नाही.

शिवसेनेचा जन्म कसा झाला, शिवसेना हे आपल्या संघटनेला नाव दिले हे सुद्धा एक थ्रील आहे. बाळासाहेब मार्मिकचे संपादक झाल्यावर मराठी माणसावरील अन्याय ते परखडपणे व रोखठोकपणे मांडीत असत. एक दिवस दादांनी (प्रबोधनकार ठाकरे) विचारले मार्मिक मध्ये जे विचार मांडता ते सोडवण्यासाठी तसेच अन्याय दूर करण्यासाठी एखादे संघटनात्मक काही करता येईल का ? यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. या संघटनेला शिवसेना हे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनीच दिले. एका छोट्याशा खोलीत 18 कार्यकर्त्यांच्या साथीने शिवसेनेचा जन्म झाला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या खोलीतच ही मीटिंग झाली. ती तारीख होती 19 जून 1966 या दिवसाची. मुंबईत मराठी माणसावरील अन्याय व अत्याचार विरोधात हा पक्ष स्थापन झाला. मुंबई शहराची सर्वस्वी जवाबदारी शिवसेनेने अंगावर घेतली. ही सेना स्वर्गीय बाळासाहेबांनी सक्षमपणे चालवली. आता उद्धव ठाकरे यांनी जबाबदारी घेतली आहे. सेना कट्टर हिंदुत्ववादी व प्रखर राष्ट्रवादी विचारांची केली. अनेक सरकारे आली पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कधी हटले नाहीत. कोणाला कधीच शरण गेले नाहीत. सुरुवातीपासून शिवसेना एक प्रादेशिक पक्ष म्हणूनच काम करत आहे. तो पक्ष तग धरून आहे. मार्मिकची स्थापना 1960 साली झाली. मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केले. अजूनही मार्मिक शिवसेनेचे मुखपत्र म्हणून काम करीत आहे. मराठी माणसांचे प्रश्न मार्मिक मधून मांडीत आले. शिवसेना सुरुवातीला राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देत आली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला स्वतः प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते. त्यांनी या दसरा मेळाव्यात भाषण केले आणि तमाम जनतेला सांगितले, ‘हा बाळ मी तुम्हाला दिला’ लोकांनी या प्रबोधनकारांच्या घोषणेचे प्रचंड टाळ्या वाजवून स्वागत केले. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी अनेक वेळा ठाम विचार मांडले. लोकांना जेरीस आणणारे कायदे असतील तर ते जाळून टाका असे म्हणत. जनहिताच्या आड येणारे कायदे बदलले पाहिजेत. बाळासाहेबांच्या कारकीर्दीत अनेक खासदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. बाळासाहेबांनी आपल्या खासदारांचा उपयोग पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सारख्या संयमी नेत्याला त्रास देण्यासाठी केला नाही. परंतु खासदारांना कधीकधी तंबी द्यायला ते विसरले नाहीत. मिजास मारू नका, शिवसैनिकांनी घाम गाळल्यावर तुम्ही निवडून आला आहात. त्यांच्या जोरावर तुम्ही आमदार- खासदार आहात याची जाणीव ते करून देत. बाळासाहेब म्हणत तत्वाशी एकरूप राहिलो म्हणून लोक माझ्यावर प्रेम करतात. कोणत्याही पदावर नसताना लोकांच्या हृदयावर 46 वर्षे विराजमान राहिले. त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती. त्यांचा मोठा दरारा होता. विरोधक देखील त्यांना कायमपणे वचकून असायचे.

शिवसेनेचे लढाऊ नेते उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्ष व त्यांचे सहकारी पक्ष सतत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकेरी भाषा तसेच खोटे आरोप करून उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे चालू आहे. जे अपरिपक्व नेते आहेत तेच घाणेरड्या भाषेत टीका करतात. कोणताही पक्ष कुचकट वृत्तीचा असू नये. एवढ्या टोकाच्या भूमिका उद्धव ठाकरे यांच्या विरोधात का घेतात समजत नाही. ईडीच्या नोटिसा लागू झालेले डागाळलेले नेते घेऊन फिरण्यामध्ये भाजपला आनंद वाटतो. भाजप एक समजूतदार पक्ष मानला जात होता. परंतु चिडून बोलणे, खोटे आरोप घाणेरड्या भाषेत करणे, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर सतत खोटे आरोप करणे, द्वेषाने बोलणे यामुळे या पक्षाने नैतिकता गुंडाळली असे वाटायला लागले. वाजपेयी, अडवाणी, श्यामप्रसाद मुखर्जी यासारख्या थोर विचारांच्या नेत्यांचा वारसा असणार्‍या पक्षाकडून अशी अपेक्षा नव्हती. बहुमत असेल तर जरूर राज्य करा पण डागाळलेल्या नेत्यांना सोबत घेऊन भ्रष्टाचाराला पाठिंबा देऊ नका. पक्षाकडे नैतिकता असेल तर भ्रष्टाचाराचे ईडीने आरोप केलेल्या नेत्यांना तुरुंगात पाठवा. नाहीतर 2024 ला भारत देशातील सुज्ञ मतदार मताच्या पेटीतून आपल्याला उत्तर देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *