बातमी

कागलमध्ये विकासकामांसाठी रंगतोय ‘श्रेयवाद’

आगामी विधानसभेसाठी रंगीत तालीम सुरू; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

करंजीवणे(भिकाजी मसवेकर) : सध्या कागलच्या नेत्यांनी पायाला भिंगरीबांधून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा डेळय़ासमोर ठेऊन नेते आणि कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. गावोगावी कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी चढाओढ सुरू आहे. राज्यातील सत्तातंराचाही मोठा परिणाम कागलमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितासीठी इच्छुक असणारे प्रमुख कार्यकर्तेही एकमेंकाविरोधात खरपूस समाचार घेत आहेत. यानिमित्त विविध शासकीय योजना आणि विकासकांमांचे श्रेय घेण्यासाठी कागलमध्ये नेत्यांची जणू रंगीत तालीमच सुरु आहे.

आमदार मुश्रीफ-समरजित घाटगे कार्यक्रमात व्यस्त; खासदार संजय मंडलिकांची सावध भूमिका

मतदारसंघात बांधकाम कामगारांना साहित्य वाटप, पेन्शन योजना, ई-श्रम कार्ड वाटप, बैठका, मेळावे, विकासकामांचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबवले जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांतून विविध योजनांचे ‘श्रेय’ पदरी पाडण्याचा प्रयत्न सुरु असून दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. तर कार्यकर्तेही मोठय़ा प्रमाणात सक्रीय झाले आहेत.

आमादार मुश्रीफांच्या पाठीशी संजयबाबांचे पाठबळ

आगामी विधानसभेसाठी दोन्ही नेत्यांनी कंबर कसली आहे. यात विशेष म्हणजे माजी आमदार संजयबाबा हे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा दुरंगी होणार असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. गत विधानसभेला झालेल्या तिरंगी लढतीचा फायदा-तोटा लक्षात घेऊनच पुढील धोरण ठरवले जात आहे. कारण गत निवडणुकीत मुश्रीफ आमदार झाले असले तरी समरजित घाटगे यांनीही दोन नंबरचे मताधिक्य मिळवले तर माजी आमदार संजयबाबा तीन नंबरवर गेले. यामुळे समरजित घाटगे यांचे मनोबाल नक्कीच उंचावले. त्यानंतर त्यांनी मोठय़ा प्रमाणात जनसंपर्क वाढवला. त्यांच्या जोडीला त्यांची पत्नी नवोदिता घाटगे यांनीही महिला मेळावे घेऊन मताधिक्य वाढवण्यावर भर दिला. राज्यातील सत्तातंरामुळे देखील समरजित घाटगे यांना मोठे पाठबळ मिळाले आहे.

दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करताना संजयबाबांना सोबत घेतले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्या भाषणात ते मुश्रीफांच्या विकासकामांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. सध्या सुरु असणऱया योजना आमादार मुश्रीफ यांच्यामुळेच सुरू झाल्याचे आवार्जुन सांगत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुश्रीफांच्या पाठीशी ठाम असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यांचाही गट मोठा असल्याने ते मुश्रीफांच्या पाठीशी राहिल्यास मुश्रीफ आगामी विधानसभा लिलया पेलू शकतात ? परंतू त्यासाठी अजून दीड-दोन वर्षे बाकी आहेत. त्याचबरोबर गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ, अंबरिषसिंह घाटगे हे देखील सक्रीय झाले असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत आहेत.

मंडलिकांची भूमिका मात्र गुलदस्त्यात

आघाडीबरोबर असूनही गोकुळमध्ये विरेंद्र मंडलिकांचा झालेला पराभव आणि सध्या राज्यात झालेले सत्तांतर यामुळे खासदार संजय मंडलिक यांची ठोस भूमिका दिसून येत नाही. सध्या ते कोणावरही टीका-टिपण्णी करत नाहीत. शिंदे गटासोबत जाण्याचा त्यांचा निर्णय असला तरी कागलमध्ये त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतू विरेंद्र मंडलिक हे समरजित घाटगे यांच्या काही कार्यक्रमाला उपस्थिती लावतात.

2019 च्या मताधिक्यावरुन 2024 ची फिल्डिंग

2019 साली कागल विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांना 1,16,434 मते, समरजित घाटगे यांना 88,303 मते तर संजयबाब यांना 55, 657 अशी मते पडली होती. समरजित घाटगेंनी अपक्ष निवडणूक लढवत मिळवलेली मते लक्षणीय ठरली होती. त्यामुळे 2024 ची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून समरजित घाटगेंनी जनसंपर्क वाढवला आहे. तर आमदार मुश्रीफ यांनी संजयबाबांना सोबत घेऊन वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये खासदार संजय मंडलिक यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणारी असून मतांची गोळाबेरीज आत्तापासूनच सुरू असल्याचे चित्र सध्या कागलमध्ये दिसत आहे.

जि. प., पं. स.चे इच्छुकही सक्रीय

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काही प्रमुख कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यांच्याकडूनही विविध उपक्रम राबवले जात आहेत. इतकेच नाही तर संधी मिळेल त्या ठिकाणी विरोधी गटावर आरोप-प्रत्यरोप करत आहेत. आपल्याच नेत्याने शासकीय योजनांसाठी कसा पाठपुरावा केला याचा दाखल जाहीर कार्यक्रमातून मतदारांना देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *