मुरगूड ( शशी दरेकर) – आय आय टी मद्रास (चेन्नई) द्वारे देण्यात येणाऱ्या Web Enabled एम.टेक. या प्रोग्रॅम मधून विश्वजीत बाबासाहेब बुगडे यांची पदव्यूत्तर शिक्षणासाठी निवड झाली. सध्या ते एनएक्सपी सेमीकंडक्टर या कंपनीत एनालॉग डिझाईन इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच काम हे इलेक्ट्रॉनिक्स व व्हीएलएसआए क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण हे मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स या स्ट्रीम मधून होणार आहे.
आय आय टी मद्रास ही इंजिनिअरिंग व त्यातही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन करणारी देशातील उच्च नामांकित संस्था आहे.
ही संस्था देशातील काही नामांकित कंपन्यांशी सलग्न असून विविध अत्याधुनिक व अद्यावत तंत्रज्ञानात उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञ तयार करत असते. त्यासाठी ते या कंपन्यांकडून शिफारस केलेल्या तंत्रज्ञांकरिता ऑनलाइन एम.टेक कोर्सेस ऑफर करतात. आय आय टी या तंत्रज्ञांची निवड देश पातळीवर प्रवेश परीक्षेद्वारे करते व त्यांना एमटेक चा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवते. या तंत्रज्ञांना कंपनीच्या कामासोबतच समांतर हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
विश्वजीत हा जय शिवराय एज्युकेशन सोसायटी च्या शिवराज विद्यालय मुरगुड येथील माजी विद्यार्थी असून शिवराज चे माजी प्राचार्य बी आर बुगडे सर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे मोठे भाऊ विकास हेही एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीत सीनियर डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.