एकत्रित दर्शनाने जागल्या स्वर्गीय खासदार मंडलिकांच्या आठवणी…
म्हाकवे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजयदादा मंडलिक यांनी श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी ता. चिकोडी जिल्हा बेळगाव येथे श्री. हालसिद्धनाथांचे एकत्रित दर्शन घेतले. या दोन्हीही मान्यवरांच्या एकत्रित दर्शनाने यावेळी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार दि.२६ सप्टेंबर २०२१ रोजी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ व खासदार श्री. मंडलिक एकाच गाडीतून कागलवरून आनुरकडे विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. राष्ट्रीय महामार्ग सोडून आप्पाचीवाडी येथील चौकात येताच गाड्या श्री. हालसिद्धनाथ देवस्थानाकडे वळल्या. या दोघा मान्यवरांनी हालसिद्धनाथासमोर नतमस्तक होत दर्शन घेतले.
दरम्यान; आनुर येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडीचे श्री. हालसिद्धनाथ हे जागृत देवस्थान आहे. ज्या-ज्या वेळी मी आणि स्वर्गीय मंडलिकसाहेब आप्पाचीवाडीवरून म्हाकवे, आनुर तसेच पुढच्या गावांच्या दौऱ्यासाठी जायचो, त्यावेळी आम्ही दोघेही आप्पाचीवाडीत उतरून एकत्रित दर्शन घ्यायचो.
“माझाही खारीचा वाटा………!
आप्पाचीवाडी येथे दर्शन घेऊन गाड्या आनुरच्या दिशेने जात असतानाच म्हाकवे गावच्या स्वागत कमानीजवळच सौ. सुशीला रामचंद्र पाटील रा. म्हाकवे या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलेने हात दाखवून गाड्या थांबविल्या. गाड्या थांबताच सौ. पाटील यांनी आपल्या संजय गांधी निराधार पेन्शनमधील एक हजार रूपये मंत्री श्री. मुश्रीफ यांना अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या खर्चासाठी खारीचा वाटा म्हणून योगदान दिले. त्यांच्या या कृतीने मंत्री श्री. मुश्रीफ व खासदार श्री. मंडलिक दोघेही भारावले.