बातमी

मिनी बसने इनोव्हा व मोटरसायकलला समोरून जोराची धडक

सिद्धनेर्ली, ता. २१ : कागल-निढोरी राज्य मार्गावर कागलजवळ शाहू साखर कारखाना फाट्यावर मिनी बसने इनोव्हा चार चाकी व मोटरसायकलला समोरून जोराची धडक देऊन झालेल्या तिहेरी अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.नवनाथ दत्तात्रय धनगर (वय २८) रा. एकोंडी ता.कागल असे मयताचे तर आप्पाजी धुळाजी हजारे (वय १८) रा. सिद्धनेर्ली असे जखमी तरुणाचे नाव आहे.

हे दोघेजण आरेवाडी येथून देवदर्शन करून गावाकडे परत येत होते. विशेष म्हणजे मयत नवनाथच्या आजी साऊबाई यांचे बारा दिवसांपूर्वी निधन झाले आहे.आजीच्या बाराव्या दिवशीच नातवावर गुढीपाडवा सणाच्या आदल्या दिवशी काळाने घाला घातला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. मिनी बसने दिलेली धडक इतकी जोराची होती की मोटरसायकलला शंभर फुटांपेक्षा अधिक अंतर अक्षरशःफरपटत नेऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली. यामध्ये नवनाथच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर मोटरसायकलचाही चुराडा झाला आहे.मिनी बस व ईनोवा गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

गुढीपाडवा सण काळवंडला…!

मयत धनगर यांच्या कुटुंबीयांवर बारा दिवसाच्या अंतरात आजी व नातू गमावण्याची वेळ आली बुधवारी होणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरी तसेच बकऱ्याच्या तळावरील होणाऱ्या गादी पूजन व लाखेच्या विधी या धार्मिक कार्याची धनगर कुटुंबीयांची तयारी सुरू होती.मात्र मात्र बारा दिवसापूर्वी निधन झालेल्या साऊबाई या आजींच्या पाठोपाठ आज तरुणच असलेल्या नवनाथच्या अपघाती मृत्यूने या उत्साहावर विरजण पडले. एकंदरीतच मयत धनगर यांच्या कुटुंबीयांवर बारा दिवसाच्या अंतरात आजी व नातू गमावण्याची वेळ आल्याने धनगर कुटुंबीयांचा गुढीपाडवा सण या दुःखद प्रसंगामुळे काळवंडला.

अपघातग्रस्त मिनीबसचा क्रमांक एम एच११ टी ९४९७, इनोव्हा गाडीचा क्रमांक एम एच ०५ बी एस ५९०९ तर हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलचा क्रमांक एम एच ०९ सी क्यू ६८०६ असा आहे. मिनी बसचा चालक राजेंद्र बबन खंडागळे (वय५४) रा. कोरेगाव जि. सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हृदय पिळवटणारा आक्रोश व निरागस चिमुकली…!
आजीच्या मृत्यूच्या दुःखाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच धनगर कुटुंबियांवर तरुण नवनाथच्या अपघाती मृत्यूचा काळाने घाला घातला.त्याचा मृतदेह घरी आणताच पत्नी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.मात्र नेमके काय झाले आहे हे न कळणारी त्याची दोन चिमुकली मुले निरागसपणे या सगळ्याकडे पाहत होती. त्यामुळे उपस्थितांच्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून समजलेली माहिती अशी. भरधाव वेगाने कागलकडे जाणाऱ्या मिनी बसने समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीला समोरुन उजव्या बाजुला जोराची धडक दिली. त्यामुळे चालकाचा ताबा सुटलेली मिनीबस रस्त्याच्या उलट्या दिशेने फिरली व निढोरीकडे चाललेल्या मोटरसायकलला समोरुन धडक देऊन फरफटत नेले. या तिहेरी अपघातामुळे राज्य मार्गावर बघ्यांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मयत नवनाथ यांच्या मागे आई हिराबाई,वडील दत्तात्रय , पत्नी माधुरी, दोन मुले सक्षम व स्वरुप व भाऊ पांडुरंग असा परिवार आहे.

विचित्र योगायोग

या तिहेरी अपघातातील तीनही वाहने देवदर्शनासाठी गेली होती. मिनी बसमधील प्रवाशी आदमापूर येथून आले होते.इनोव्हामधील प्रवाशी आदमापूरकडे चालले होते.तर दुचाकीस्वार आरेवाडी येथून देवदर्शन करुन आले होते.मिनीबसच्या धडकेनंतर इनोवा गाडी पुढे गेली. त्यामुळे त्या पाठीमागे असलेली दुचाकी मिनी बसच्या तावडीत सापडली. ईनोवा गाडी जर पास झाली नसती तर यापेक्षा मोठा अपघात झाला असता. अशी चर्चा अपघात स्थळी सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *