मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदु धर्म संस्कृतीमध्ये, मराठी नववर्षातील पहीला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. मुरगुडमध्ये गुढीपाडवा साजरा करताना, मुरगुडवासीयांच्या चेहर्यावर एक नवचैतन्य पहायला मिळत होते. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे घेवून आलेल्या या सोनेरी दिवसाची सुरूवात सामर्थाचं प्रतिक असणाऱ्या उंचच्या उंच वेळकाठीच्या गुढ्या उभारून झाली. सकाळी पहाटेच्या प्रहरी प्रत्येकांच्या दारी मुरगुडवासीयांची गुढ्या उभारण्यासाठीची लगबग लक्ष वेधून घेणारी ठरली.
या गुढीला यशश्री खेचून आणण्याचा संदेश देणारा तांबे धातूचा कलश अडकविला होता.आरोग्यांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी गुढीला आंब्याचे ,कडुलिंबाचे डहाळे बांधलेले पहायला मिळाले.मांगल्याचे प्रतिक असणारा पुष्पहार, सौभाग्याचे प्रतिक असणारा हळदीकुंकू आणि सिद्धीचे प्रतिक असणारा श्रीफळसुद्धा गुढीसोबत पहायला मिळाला.वैभव संपादन करण्याचा संदेश देणारी जरीची साडी गुढीवर फडकताना दिसली.
अगदी थाटात,डौलदारपणे प्रत्येकाच्या दारात उभ्या असणाऱ्या या गुढ्या जणू आयुष्यातील आव्हानांना भिडण्यासाठी आव्हानासमोर न डगमगता पाय रोवून उभं राहण्याची हिम्मत देतायेत असं या गुढ्यांकडे पाहिल्यानंतर वाटतं होतं.
एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात ” गुडीपाडवा सण ” नवीन वर्षाचे स्वागत करत मोठया उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात एकमेकानां-गुडीपाडव्याच्या शुभेच्छा देत साजरा करतानां दिसून आला .