02/10/2022
0 0
Read Time:10 Minute, 16 Second

कागलमध्ये मंडलिक गट, मुश्रीफ गट व संजयबाबा घाटगे गटाच्या ठरावधारकांचा संयुक्त मेळावा उत्साहात

कागल, दि.१०:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारणविरहित केला, असेही ते म्हणाले.

कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या ठराव धारकांच्या संयुक्त मेळाव्यात, मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच मंत्री श्री.मुश्रीफ यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार सुरू असतानाही दवाखान्यातून थेट मेळाव्यात आलेल्या खासदार श्री. मंडलिक व माजी आमदार श्री.घाटगे यांचे आभार मानले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात एकूण ८३७ ठरावधारक आहेत. त्यापैकी ८०० महाविकास आघाडीचे आहेत. प्रशासकाची सत्ता जाऊन सहा वर्षांपूर्वी बँकेचा कारभार हाती घेतला. त्यावेळी १३७ कोटी संचित तोटा होता. थकित कर्ज वसुलीचे फार मोठे आव्हान समोर होते. तशाही परिस्थितीत वसुलीसाठी हलगी, ताशा, सनई, चौघडा घेऊन प्रसंगी मित्रमंडळींच्यासुद्धा दारात गेलो. बँकेचे मालक म्हणून नव्हे तर, विश्वस्त म्हणून कामकाज केले. ते पुढे म्हणाले, बँकेची गाडी, नाश्ता, जेवण, हॉटेल भाडे, प्रवास भाडे या कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत. माझ्यासह संचालक मंडळातील माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी.एन.पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह कुणीही या बँकेचा पाच पैशाचासुद्धा लाभ घेतलेला नाही, हे अभिमानाने सांगेन. बँकेचा मालक असलेल्या शेतकर्‍यांसह, कर्मचारी, पगारदार, नोकरदार व गटसचिवांनाही विमासुरक्षा लागू केल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार संजयदादा मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यावर नियतीनेच सातत्याने अन्याय केला आहे, त्यांनाही योग्य तो मान सन्मान मिळावा, अशी आपली भावना आहे.

उरलो उपकारापुरता…
मंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक भाषणात नेहमी म्हणायचे, मी उरलो आता उपकारापुरता. आपले व संजयबाबा घाडगे यांचेही वय आता सत्तरीच्या घरात आहे. जय-पराजय, निवडणुका, लढाया हे सगळं आता झाले. वैर -मतभेद कुणाशी धरायचे? त्यामुळे संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, तुका म्हणे….., आता मी उरलो विकासकामे आणि जनसेवेच्या उपकारापुरता, असेही ते म्हणाले.

खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आहे. स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि अलिकडच्या काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाने बँकेचा लौकिक वाढविला आहे. हा लौकिक टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्हा – आम्हा सर्वांची आहे. औगेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात बँकेने सर्वोच्च लौकिक मिळविला आहे. त्यामुळे, निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. सहा वर्षांपूर्वी बँकेच्या संचालक मंडळात गेल्यानंतर अत्यंत अडचणीत असलेल्या बँकेचा परवाना राहतोय की नाही, अशी शंका वाटत होती. केडीसीसी बँकेच्या निमित्तानेच मंडलिक गट आणि मुश्रीफ गट असा वाद निर्माण झाला होता व संघर्ष झाला होता. परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीत कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व संजयबाबा घाटगे गट एकत्र येत आहोत, ही चांगली गोष्ट आहे.

मुश्रीफांच्या कार्यपद्धतीचा विजय….
खासदार संजयदादा मंडलिक म्हणाले, सहा वर्षांपूर्वी आम्ही बँकेच्या संचालक मंडळात गेलो. त्यावेळी अत्यंत अडचणीत असलेल्या या बँकेचा परवाना राहतोय की रद्द होतो, अशी शंका वाटत होती. परंतु, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने बँकेला वैभवाच्या टप्प्यावर आणून ठेवले. मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीचा हा विजय आहे, असेही ते म्हणाले.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नेतृत्व गोरगरिबांचे व कणखर होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण झालेले पराकोटीचे संघर्षशील त्यांचे नेतृत्व होते. त्याच पद्धतीने मंत्री हसन मुश्रीफ हर परिस्थितीशी सामना करीत संघर्षशील नेतृत्व म्हणून सिद्ध झालेले आहेत. आपण सर्वजण त्यांना पाठबळ देऊया. मंत्री मुश्रीफ यांना पाठिंबा हे ते मंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे म्हणून देत नाही आहोत. तर, अगदी मंत्रीपदापासून ते गावाच्या एखाद्या ग्रामपंचायत सदस्य व त्याखाली असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी त्यांची कामाची पद्धत आहे. म्हणूनच हा पाठिंबा देत आहोत, असेही श्री घाटगे म्हणाले.

सदैव मुश्रीफ यांच्याच पाठीशी….
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, गेली ३६-३७ वर्ष हसन मुश्रीफ यांच्याशी बिन तडजोडीचा संघर्ष केला. काही लोकांनी आपला टीआरपी वाढवण्यासाठी आमचा वापर त्यांच्या विरोधात केला. परंतु, आता आम्ही ठरविले आहे की, यापुढे सदैव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच पाठीशी राहायचं.

प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, सहा वर्षापूर्वी १३७ कोटीच्या संचित तोट्यामध्ये असलेली बँक सरासरी दीडशे कोटी नफ्यावर आणली आहे. त्यावेळी तीन हजार कोटींवर असलेल्या ठेवी आज तब्बल साडेसात हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. येत्या मार्च अखेरीस ठेवी साडेनऊ ते दहा हजार कोटींवर व नफा दोनशे कोटींवर पोहोचेल. आजघडीला बँकेचा संयुक्त व्यवसाय पंधरा हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत पीककर्ज बिनव्याजी देणारी राज्यासह देशातील ही पहिली व एकमेव बँक आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील-बिद्री व धनराज घाटगे -वंदूरकर यांचेही मनोगत झाले. व्यासपीठावर बँकेचे संचालक अनिल पाटील, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.शिवानी भोसले, जिल्हा परिषद सदस्य अमरीश घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संभाजीराव भोकरे, गणपतराव फराकटे, बापूसाहेब शेणवी, रमेश तोडकर, सूर्यकांत पाटील, दिनकरराव कोतेकर, बाजीराव गोधडे, एम.आर.चौगुले, रमेश माळी, बापूसाहेब भोसले, जयसिंगराव भोसले, दत्ता पाटील, प्रवीणसिंह भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. आभार विकास पाटील यांनी मानले.


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!