बातमी लेख

जागतिक उच्च रक्तदाब दिन (14 मे)

वर्ल्ड हायपरटेन्शन लीगच्या वतीने दरवर्षी १४ मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून पाळता जातो. आपल्या रक्तवाहिन्यांमधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. या आजाराविषयीचे दुष्परिणाम लक्षात घेता या आजाराविषयी जागरुकता निर्माण होण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन पाळला जातो.

उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने याला सायलेंट किलर असे संबोधले जाते. सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे, याची कल्पनाच अनेकांना नसते.

धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. असंसर्गजन्य आजारामुळे मृत्यू प्रमाण भारतामध्ये वाढले आहे. एकूण मृत्यूपैकी ६ टक्के पुरुष व ५२ टक्के स्त्रीयांचे मृत्यू असंसर्गजन्य आजारामुळे होतात. त्यामुळे या आजाराची वेळीच माहिती करुन घेणे आणि तणावमुक्त स्वस्थ जीवनमान आत्मसात करणे अत्यावश्यक बनले आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंर्गत ३० वर्षावरील वयाच्या प्रत्येक स्त्री व पुरुषांची उच्च रक्तदाब, मधुमेह व सामान्य कर्करोग यासाठीची Screening करुन घेण्याचे काम सध्या चालू आहे. NCD Cell अंतर्गत त्यासंबंधीचे समुपदेशन, व्यायाम, आहारातील बदल, दिनचर्या याबद्दल माहिती दिली जाते.

रक्तदाब म्हणजे काय- रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून जाण्यासाठी लागणारा दाब म्हणजे रक्तदाब. आपल्या शरीरात रक्तसंचार करण्यासाठी दबावाची आवश्यकता असते. हा दबाव हृदयाच्या नियमित होणाऱ्या स्पंदनामुळे उपलब्ध होतो.

उच्च रक्तदाबाची कारणे, लक्षणे व उपाय-

कारणे– निष्क्रियता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारुचे व्यसन, अति मानसिक ताण, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, आनुवंशिक कारणे, जसे मधुमेह, थॉयराईड व किडनीचे विकार

लक्षणे – अंधुक दिसणे, वारंवार चिडचिड होणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, धाप लागणे, छातीत कळ येणे, वारंवार डोके दुखणे, डोके जड होणे.

दुष्परिणाम- रेटिनोपैथी (अंधत्व येणे), मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, अर्धांगवायू (लकवा), हृदयविकाराचा झटका

नियमित व्यायाम (डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे), ताण-तणाव टाळावे, मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, जीवन शैलीमध्ये बदल करणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपानाचे व्यसन न करणे, नियमित वैद्यकीय सल्ला घेणे, नियमित ब्लड प्रेशर तपासणे, ब्लड प्रेशरची नियमित औषधे घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुरेशी झोप घेणे.

रक्तदाब नियंत्रणात असेल, तर करोनाची गुंतागुंत होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यामुळेच घरच्या घरी नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करावी व तज्ज्ञ डॉक्टरांचा टेलिफोनिक सल्ला घेऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवावा, असा सल्ला जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित तज्ज्ञांनी दिला आहे.

व्याधीग्रस्तांना करोनाचा जास्त धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे आणि उच्च रक्तदाब ही गुंतागुंत निर्माण करणारी व्याधी असू शकते, हेही दिसून आले आहे. ‘महत्त्वाच्या व्याधीमध्ये (कोमॉर्बिडिटीज) मधुमेह, स्थूलता, उच्चरक्तदाब आदींचा समावेश होतो. मात्र उच्चरक्तदाब असूनही तो सातत्याने पूर्णपणे नियंत्रणात असेल तर अशा व्यक्तींना कोव्हिडचा धोका हा सर्वसाधारणपणे उच्च रक्तदाब नसणाऱ्यां इतकाच राहतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणासाठी दक्ष राहून नियमितपणे तपासणी केली पाहिजे व तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधे घेतली पाहिजेत.

योग्य रक्तदाबाचे महत्व ‘शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा होण्यासाठी रक्ताभिसरण आवश्यक आहे आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक आहे. व्यक्तीचा वरचा रक्तदाब म्हणजेच सिस्टोलिक ब्लड प्रेशर १४० एमएमएचजीपेक्षा जास्त असेल आणि खालचा रक्तदाब म्हणजेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर ९० एमएमएचजीपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे, असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. शहरी भागात याचे प्रमाण ६ ते ७ टक्के, तर ग्रामीण भागात ३.५ ते ४ टक्के आहे. वय, अनुवंशिकता, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच वेळीअवेळी खाणे, स्थुलता, अपुरी झोप, मांसाहाराचे अतिसेवन, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंक फूडचे अतिसेवन, स्टेरॉइड्सचा वापर आदी घटक उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे. करिअरमधील तीव्र स्पर्धा व त्यामुळे वाढणारे ताणतणाव यामुळे कमी वयातच अनेकांमध्ये उच्च रक्तदाब दिसून येत आहे

उच्च रक्तदाबाची लक्षणे – डोक्याच्या मागील भागात, मानेमध्ये वेदना, श्वास घेताना त्रास होणे, अंधुक दिसणे, लघवीद्वारे रक्त पडण्याची समस्या, चक्कर येणे, थकवा, सुस्ती, रात्री झोप न येणे.

उच्च रक्तदाबामुळे होणारे आजार- हृदयरोग, पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व, स्मृतीभंश.

आहार-विहार- आहारातील मीठ दोन ग्रॅमपेक्षा जास्त नको, सर्व प्रकारचे तंबाखू सेवन वर्ज्य करा, वजन हे उंचीच्या प्रमाणातच ठेवा, सेंटिमीटरमधील उंची वजा १०० एवढेच वजन हवे – आहारात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, सलाड, फळांचे प्रमाण वाढवा, सर्व प्रकारचे फास्ट फूड, तळलेले पदार्थ, तेल-तुपापासून बनवलेले पदार्थ वर्ज्य करा, योगासने, प्राणायाम, चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे, मैदानी खेळ गरजचे, ताणतणावाचे नियोजन आवश्यक, समुपदेशनाचा उपयोग होऊ शकतो, सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे, जीवनशैली निरोगी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच रक्तदाब व रक्तातील साखर मोजून घ्या. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर है।

प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *