कोल्हापूर, दि. 31 : जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही. सर्व कार्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करेन.. अशी शपथ महसूल व पोलीस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेतली.
राज्यात भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत, विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शपथ घेण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी या प्रतिज्ञेसह मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विवेक काळे, अपर चिटणीस तथा तहसीलदार संतोष कणसे, तहसिलदार अर्चना कापसे, सरस्वती पाटील, नायब तहसीलदार मनिषा माने, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.