कागल(विक्रांत कोरे): करनूर तालुका कागल येथे भव्य कुस्ती मैदान पार पडले. प्रथम क्रमांकासाठी बानगे चा पैलवान शशिकांत बोंगार्डे व इंचलकरंजी चा पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात लढत झाली. यामध्ये बानगेचा पैलवान शशिकांत बोंगार्डे याने अकराव्या मिनीटाला लवदल काढून घिस्सा डावावर इंचलकरंजी चा पैलवान श्रीमंत भोसले याला अस्मान दाखविले.
येथील मरीआई बिरदेव यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित केले होते. कुस्ती स्पर्धेसाठी गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, अमरिश घाटगे व शाहू साखर चे चेअरमन समरजितसिंह घाटगे, रमेश लालवानी, मोहन जाधव, मंडलिक साखर कारखान्याचे प्रकाश पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी उपस्थित होते.
बानगेच्या पैलवान शशिकांत बोंगार्डेची बाजी
प्रथम क्रमांकाचा विजेता पैलवान शशिकांत बोंगार्डे यांस कैलासवाशी सुभाष घोरपडे यांच्या स्मरणार्थ सचिन घोरपडे यांनी मानाचा चषक देऊन सन्मानित केले. यात्रा कमिटीने रोख बक्षीस दिले. द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मौजे सांगाव चा पैलवान मोहन पाटील यांने अर्जुनवाडच्या पैलवान प्रणव यादव वर साईड घिस्सा डावावर विजय मिळविला. व कोल्हापूरचा पैलवान किरण पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला. मैदान कुस्ती शौकीनानी खचाखच भरले होते. शंभर कुस्त्या पुरुष पैलवान व पाच कुस्त्या महिला पैलवान यांच्यात लावण्यात आल्या. लहान गटापासून कुस्तीस प्रारंभ झाला.चटकदार कुस्त्यानी उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
करनूर केसरी गदा- कोरोना महामारी मुळे तीन वर्षे करनूर येथे कुस्ती मैदान नसल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली होती. परंतु यावर्षी यात्रे निमित्ताने कुस्ती शेतकऱ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. या मैदानामध्ये नामवंत मल्लांनी सहभाग नोंदविला. दरम्यान पुढील वर्षी पुणे येथील सद्गुरू ज्वेलर्स चे अमरसिंह बाळासाहेब पाटील यांच्याकडून “करनूर केसरी ही मानाची गदा “देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
गोकुळ केसरी कधी? – सन 2008 सालापासून गोकुळ केसरी ही कुस्ती स्पर्धा घेतली नाही ती कधी होणार अशी उपस्थित पैलवानांच्या कडून व निवेदकांकडून मागणी होत होती . महाराष्ट्रातील नामवंत मल्लांकडून गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धेकडे नजरा लागून राहिलेल्या आहेत.
भैरवनाथ आरेकर शिवाजी जमनिक शंकर कदम मारुती पवार हिंदुराव पाटील वाकरे कर हे पंच म्हणून लाभले चौगुले यांनी निवेदन केले समीर शेख ,उपसरपंच प्रवीण कांबळे ,यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक शिरोळे ,इम्रान नायकवडी, तातोबा चव्हाण, सुनील गुदले, आनंदा पाटील ,मनसेचे बाळासो पाटील आदी मान्यवरांसह कुस्ती शौकीन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.