निराधार, गरीब व गरजूंचे आधारकेंद्र ! – प्रा.सुनिल डेळेकर यांचे गौरवोदगार
मुरगूड (शशी दरेकर) :
मुरगूडच्या श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीतून विधायक वाटचाल केली . ही पतसंस्था अनेक गरीब ‘ निराधार गरजूंचे आधार केंद्र बनली आहे असे गौरवोदगार मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनचे अध्यक्ष प्रा . सुनिल डेळेकर यांनी काढले.
येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मीनारायण पत संस्थेस उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंतरराज्य पुरस्कार मिळाला या निमित्ताने पत्रकार फौंडेशनच्यावतीने संस्थेचे चेअरमन पुंडलिक डाफळे यांच्यासह संचालक मंडळाचा सत्कार करून गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत संस्थेचे माजी सभापती अनंत फर्नांडीस होते. तर उपसभापती रविंद्र खराडे संचालक किशोर पोतदार, दत्तात्रय तांबट, चंद्रकांत माळवदे (सर) प्रमुख उपस्थित होते.
या गौरव कार्यक्रमात पत्रकार फौंडेशनचे उपाध्यक्ष समीर कटके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना सभापती पुंडलिक डाफळे म्हणाले, ‘ लक्ष्मी नारायण पतसंस्थेने पदाधिकारी व कर्मचारी यांनी हातात हात घालून सांघिकपणे सभासदांच्या हिताचा सदैव विचार करुन कारभार केला. त्यामूळेच संस्थेचा लौकीक व विश्वास वाढला आहे .भविष्यातही ही संस्था उत्तुंग अशी भरारी घेईल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. या समारंभप्रसंगी उपप्राचार्य रविन्द्र शिन्दे, पत्रकार अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या प्रगतीबद्दल गौरवोदगार काढले . याप्रसंगी पत्रकार दिलीप निकम ‘ राजू चव्हाण , जे.के. कुंभार , एल व्ही . शर्मा ‘ संस्थेचे जनरल मॅनेजर नवनाथ डवरी आदि उपस्थित होते . शेवटी शाखाधिकारी श्री सणगर यांनी आभार मानले.