अन्य तिघे जखमी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पशुसंवर्धन विभागातील सेवा निवृत्त कर्मचारी डॉ. संजय जयसिंगराव चौगुले (वय 57)यांचा कर्नाटकातील हुक्केरी नजीक हुक्केरी गोकाक रोडवर असणाऱ्या शासकीय महाविद्यालयाजवळ व शासकीय कॉलेज समोर झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. घटनेत अन्य तिघे जखमी झाले जखमींवर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची नोंद हुक्केरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पशुवैद्य डॉ.संजय चौगुले पत्नी सौ.सविता संजय चौगुले (वय 47) मामी सौ.विजया सदाशिव सूर्यवंशी पाटील (वय 60) व नातेवाईक अनिल ज्ञानदेव गुजर (वय 55) यांच्यासह सौंदत्ती येथे देवदर्शनासाठी गेले होते. दुर्देवी घटनेत त्यांची पत्नी सविता,मामी सौ विजया व अनिल जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
श्री चौगुले आपली व्हॅगनार (MH 09 CM 5822) आज सकाळीच प्रवासास निघाले.संकेश्वर येथे नाष्टा करून पुढील प्रवासास निघाले.सकाळी 9:30 वा हुक्केरी नजीक आल्यानंतर रस्त्यावर आडवे आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात संजय यांचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी वेगाने रस्त्यानजीक असलेल्या झाडावर आदळली या अपघातात डॉक्टर चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात ग्रस्त गाडीच्या स्थिती वरून घटनेची भीषणता लक्षात येत होती. घटनेनंतर त्यांचे मित्रमडळी व नातेवाईकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
हुक्केरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी नंतर मुरगूड येथील निवासस्थानी मृतदेह सायंकाळी 5 :30 वाजता आणण्यात आला. व मुरगूड येथे-शोकाकुल वातावरणात सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. संजय यांच्या पश्चात आई वडील दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.