बातमी

कागल विधानसभा मतदारसंघाचा शंभर टक्के विकास करणार – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

जैन्याळमध्ये साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने

सेनापती कापशी / प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या येत्या तीन वर्षाच्या कार्यकाळात कागल,  गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघाचा शंभर टक्के विकास करणार, असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यानंतर मतदार संघात येत्या पंचवीस वर्षात सांगायलासुद्धा काम शिल्लक असणार नाही, असेही ते  म्हणाले.

जैन्याळ ता. कागल येथे  आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसह साडेचार कोटींच्या विकास कामांची उद्घाटने व प्रारंभ  कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सौ. शिल्पाताई शशिकांत खोत होत्या.

भाषणात श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या तीस -पस्तीस वर्षांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीत गट-तट, पक्ष कधीच पाहिला नाही. कुठल्या गावाने किती मते दिली, याचा कधीच विचार केला नाही. ग्रामपंचायत उलटी असो वा सुलटी. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
    
यावेळी येथील कु. सुप्रिया दिनकर  पाटणकर यांनी जर्मन विद्यापीठातून संशोधनातील ‘मास्टर ऑफ सायन्स’ ही पदव्युत्तर पदवी घेतल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.

स्वखर्चातून जमीन………. 
परशुराम शिंदे म्हणाले, चार वर्षांपूर्वी गावात आरोग्य उपकेंद्राची गरज असल्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. परंतु गायरान जमीन दोन किलोमीटरवर असल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी साडेपाच गुंठे जागा स्वखर्चाने खरेदी करून त्यावर सुसज्ज व सुंदर असे आरोग्य उपकेंद्र उभारले असल्याचा आहे.

न आटणारा समुद्र……….. २००९ ते २०१४ या कालावधीत कामगारमंत्री पद आपल्याकडे असताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाकडे बारा हजार कोटींच्या ठेवी आहेत. दरमहा साडेचारशे कोटींचे व्याज येते. या पैशातूनच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांना स्थैर्य देणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. कल्याणकारी महामंडळ म्हणजे न आटणारा समुद्र आहे. यातून कामगारांचे कल्याण करतच राहू, असेही ते म्हणाले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, परशुराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरूकलीकर, कागल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, एम. आर. शेळके, पी. के. पाटील, दिगंबर शेळके, दिनकर पाटणकर, वंदना जाधव, ज्ञानदेव भोंगाळे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विशाल शिंदे, शिवाजी शेळके, सर्वजनिक बांधकामचे उप अभियंता डी. व्ही. शिंदे, यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उपसरपंच संजय बरकाळे यांनी केले. सूत्रसंचालन आर. के. पाटील यांनी केले. आभार अशोक जाधव यांनी मानले.
     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *