बातमी

राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत निढोरीच्या सागर चितळेने पटकावले सुवर्ण व रौप्यपदक

४ X ४००मी. रिलेत प्रथम तर ४००मी. अडथळा शर्यतीत उपविजेतेपद

मुरगूड ( शशी दरेकर ) – पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या ४२ व्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेमध्ये निढोरी ता. कागल येथील हौशी अँथलिट सागर बाळू चितळे या ३५ वर्षीय युवकाने ४ X ४०० मी. रिलेत प्रथम तर ४००मीटर अडथळा शर्यतीमध्ये उपविजेतेपद पटकावले. १९ राज्यांच्या खेळाडूंसह बांगलादेश व श्रीलंका देशातील खेळाडूही या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

तरुण संघ व्यायाम गट मिदनापूर मास्टर्स ऍथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धा झाल्या. ३० ते ४०वर्षे वयोगटामध्ये सागरने ४००मीटर अडथळा शर्यतीचे अंतर १ मिनिट २०.१५ सेकंद इतक्या वेळेत पार केले. तर सागरचा समावेश असलेल्या संघाने ४ X ४०० मी. रिले शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावताना निर्धारित अंतर ४ मिनिट 39 सेकंदामध्ये पार करून विक्रमी वेळ नोंदवली. रिले संघाचा कर्णधार सागर चितळे (कोल्हापूर) बरोबर या संघात प्रशांत अंदार फौजी(सोलापूर), समाधान कोळी(मुंबई), अनिल दस (मुंबई) यांचा समावेश होता.

22 जानेवारीला मुंबईत कांदिवलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत सागरने यश मिळवल्याने त्याची पश्चिम बंगाल येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सागर हा उत्कृष्ट व हौशी अँथलेट असून त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले आहेत. सध्या तो कोल्हापूरच्या डीसीबी बँकेमध्ये सेवेत असून त्याचे आई-वडील, पत्नी, सुरज कोळी व संकेत पवार यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *