बातमी

प्रिंट मीडियाची विश्वासार्हता आणि खप आजही टिकून : डॉ.योगेश जाधव

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा पुरस्कार सोहळा दिमाखात

मुरगूड ( शशी दरेकर ) : इंटरनेट’ आणि ‘सोशल मीडिया’ मुळे पत्रकारितेमध्ये अमुलाग्र बदल झालेला असला तरीही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता आणि खप आजही टिकून आहे असे प्रतिपादन दैनिक ‘पुढारीचे’ चेअरमन व ‘समूह संपादक’ डॉ. योगेश जाधव यांनी केले.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात ‘पत्रकार गौरव सोहळ्यात’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .’बी न्यूज’ चे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्राचार्य विराट गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.योगेश जाधव पुढे म्हणाले, टीव्ही आल्यापासून प्रिंट मीडिया धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पण आपल्या विश्वसनीयतेवरच प्रिंट मीडिया आज पर्यंत टिकून आहे. कोरोनाच्या काळात शहरी भागांमध्ये प्रिंट मीडियाला प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. पण ग्रामीण भागामध्ये प्रिंट मीडियावर अद्याप तरी परिणाम झालेला नाही. बातम्यांच्या विश्वसनीयते बाबत वाचक वर्ग आज ही प्रिंट मीडियावरच अवलंबून आहे ही खूप मोठी बाब आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.शिवाजीराव भुकेले(गडहिंग्लज) म्हणाले, संतांचं आणि माध्यमांचं काम सकळजणांना शहाणं करणं असतं . माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन योग्य ती दिशा देण्याचे काम करावे .
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रारंभी प्रास्ताविकामध्ये संघटनेच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विजेत्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . जागल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी सुधाकर काशीद (दै. तरुण भारत ) यांना जीवनगौरव, प्रा. रवींद्र पाटील (दै. सकाळ ) यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, मोहसिन मुल्ला ( दै. पुढारी ) यांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, दीपक घाटगे ( दै. नवराष्ट्र ) यांना आदर्श आवृत्तीप्रमुख, संतोष बामणे ( दै. पुढारी ) यांना जिल्हा उत्कृष्ट सेवा व तानाजी पाटील ( एस. न्यूज ) यांना जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार / कॅमेरामन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर उत्कृष्ट प्रेस फोटोग्राफर (कागल तालुका) राजू चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.यावेळी कोर कमिटी मेंबर प्रा.शाम पाटील, सुरेश कांबरे आदींचा डॉ.योगेश जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानीस नंदकुमार कुलकर्णी, अतूल मंडपे, रविंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे,समीर कटके,संजय सुर्यवंशी, निवृत्ती रावण यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभिजीत कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *