श्री मोरया 2022 पुरस्काराचा शानदार वितरण सोहळा
मुरगूड ( शशी दरेकर ) – जास्तीतजास्त महिलांना तसेच तरुणांना उद्योजक बनविणे हाच आमचा अजेंडा आहे. तो यापुढेही सुरु राहील असे प्रतिपादन शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. शहरात राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनने श्री.मोरया पुरस्कार २०२२ चा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कागल,गडहिंग्लज, उत्तूरसह जिल्ह्यातील १११ मंडळे,महिला बचतगट व सेवाभावी संस्थांचा गणेशोत्सवात व मागील वर्षात केलेल्या उल्लेखनीय समाज कार्याबद्दल राजे समरजितसिंह घाटगे तसेच राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे या उभयंतांच्या हस्ते गौरव केला.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या स्वप्नातील आदर्श कागल घडविण्यासाठी व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व तरुणांनी गट-तट बाजुला ठेवून एकत्र यावे. त्यांनी उद्योग व्यवसायातून स्वावलंबी बनावे.
नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे तरूण आम्ही घडविणार आहोत. त्यासाठी प्रशिक्षण ,मार्गदर्शन, अर्थसहाय्य व विविध उपक्रमांतून शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली उपल्बध करून देणार आहोत.
राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या, महिलांनी चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडावे. राजमाता जिजाऊ महिला समिती महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण, अर्थसहाय्य व विक्री व्यवस्था ,यातून व्यवसायाद्वारे स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नेहमीच पाठबळ देत आहे. यासाठी महिलांनी पुढे यावे.यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील यांचे समयोचित भाषण झाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तामामा खराडे यांना आंतरराज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,शाहू कृषीचे अध्यक्ष अनंत फर्नांडिस, उपाध्यक्ष अरुण शिंत्रे, सर्वश्री विलास गुरव, सुनीलराज सुर्यवंशी,वाय.टी.पाटील,संजय पाटील,अमर चौगुले,संजय चौगुले, प्रताप पाटील, संजय बरकाळे, सदाशिव गोधडे, अनिल अर्जुने, विजय राजीगरे, बजरंग सोनुले, संतोष वंडकर, अरुण गुरव, सुशांत कालेकर आदी उपस्थित होते.
स्वागत दगडू शेणवी यांनी तर प्रास्तविक समरजीत खराडे यांनी केले. सुशांत मांगोरे यांनी आभार मानले.