बातमी

शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांची 3 नोव्हेंबरला बैठक

कोल्हापूर (जिमाका) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि भारतीय विदेश सेवेचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वतीने ‘चांगुलपणाची चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक संवेदनशीलपणे करण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्ह्यात सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था (एनजीओ), व्यक्ती यांच्या समन्वयाने काम करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

                    या विषयांवर काम करणाऱ्या आणि काम करण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था (एनजीओ) व व्यक्तींनी आपल्या कार्याच्या माहितीसह उपस्थित रहावे. या बैठकीसाठी निवडण्यात आलेली क्षेत्रे ही आहेत- निराधार, भिकारी, दिव्यांग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच शाश्वत शेती, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, किशोरवयीन मुली, बालविवाह, एकल पालक परिस्थिती, तृतीयपंथी व्यक्तींच्या समस्या, भटक्या विमुक्त जाती, समुदाय उत्थान,  अवयवदान, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रात कार्यरत संस्था..

                    या सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्था व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सनियंत्रण आणि त्या क्षेत्रातील कामाचे नियोजन जिल्हा स्तरावर करण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल. यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये या क्षेत्रांतील शासकीय व अशासकीय काम योग्य दिशेने पुढे जाण्यास मदत होईल आणि कामाचा वेग, दर्जा आणि आवाका वाढण्यास मदत होईल. या दृष्टिने संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

                    या विषयांवर कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि त्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे सहकार्य मिळवण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे. जिल्ह्याला सामाजिक चळवळींचा वारसा लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा हा जिल्हा देशातील अनेक सामाजिक विषयांमध्ये पुढाकार घेऊन समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच जिल्ह्यामध्ये आजही अनेक सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्ती प्रामाणिकपणे आणि नेटाने आपले काम अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु असे काम करत असताना तांत्रिक मार्गदर्शन, कायदेशीर सल्ले आणि आर्थिक नियोजन, सदस्यांची संख्या महत्त्वाची असते.

अनेक नागरिकांना आणि तरुणांना या समस्यांवर काम करण्याची आणि देशाच्या जडणघडणीमध्ये आपले योगदान देण्याची तीव्र इच्छा असते. परंतु योग्य ते माध्यम व संस्थांविषयी विश्वसनीय माहिती न मिळाल्यामुळे ते या विषयांवर आपले योगदान देण्यास असमर्थ ठरतात.

या सर्व संस्थांकडे आणि व्यक्तींकडे, अगदी गाव स्तरावर सर्व नागरिकांसोबत संवाद असल्यामुळे, एखाद्या समस्येचे मूळ काय आहे आणि कोणता मार्ग अवलंबिल्यास ही समस्या समूळ नष्ट करता येईल याचे अतिशय चांगले ज्ञान असते. पण या बाबींचा उपयोग शासनास करुन घेण्यात अनेक मर्यादा येतात. शासन, प्रशासन आणि या सर्व अशासकीय स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांना एकत्र आणून एक कार्यपद्धती निश्चित करुन सर्वांनी या क्षेत्रांमध्ये काम केल्यास निश्चित सकारात्मक बदल जाणवू शकतो. या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *