कागल : कागल मुरगुड रस्त्यावर दोन कारच्या धडकेत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका बस कारमधील चालकास किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कागल मुरगुड रस्त्यावर पिंपळगाव खुर्दच्या दरम्यान मुरगूडकडून येणारी व कागल कडून येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात सायंकाळी तीनच्या सुमारास घडला. पिंपळगाव खुर्द येथे राहणारे विठ्ठल वाडकर हे कागलहून पिंपळगावच्या दिशेने आपल्या मुलासह जात होते. तर मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप शंकरराव घार्गे हे एकटेच स्वतः कार चालवत मुरगुडहून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरकडे जात होते.
मुरगुड नाका ते पिंपळगाव खुर्दच्या दरम्यान दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. वाडकर यांची कार रस्त्यावरच फिरली तर मुख्याधिकारी घार्गे यांची कार रस्त्याकडेच्या चारीमध्ये जाऊन थांबली. यामध्ये विठ्ठल वाडकर यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुख्याधिकारी घारगे यांना सुदैवाने कोणतीही दुखापत न झाल्याने ते या मोठ्या अपघातात बचावले.
या अपघाताची माहिती समजताच कागलचे मुख्याधिकारी श्रीराम पवार तसेच आरोग्य अधिकारी नितीन कांबळे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. या अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे.