भाऊ विक्रम पाटील यांची कागल पोलिसांकडे तक्रार
कागल (प्रतिनिधी) – अनंत रोटो कागल येथे जयसिंग वसंतराव पाटील वय वर्षे 48 याचा अपघाती मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला होता. हा मृत्यू अपघात नसून तो घातपात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी मयत जयसिंग चा भाऊ विक्रम वसंतराव पाटील यांने कागल पोलिसांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी अनंत रोटो नगर मधील सुमारे पन्नास हून अधिक लोकांचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना जाब विचारला व मारहाणीची नोंद व्हावी अशी मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार मयत जयसिंग पाटील व त्यांची पत्नी जयश्री हे दोघेही मतिमंद आहेत. त्याना सिद्धी नावाची तीन वर्षाची मुलगी आहे. हे तिघेजण तेथील श्री मिठारी यांचे घरी चार-पाच महिन्यापासून भाड्याने राहतात .गेल्या दोन महिन्याचे भाडे मिठारी यांना दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील साहित्य बाहेर काढून घराला कुलूप लावून जयसिंग पाटील यांना मिठारी व त्यांच्या दोन मुलांनी गणेश मंदिरा जवळ जबर मारहाण केली. मारहाणीत जयसिंग पाटील हे घायाळ झाले.
दरम्यान जयसिंग पाटील यांचा अपघात झाला. उपचारासाठी त्यास कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला. घरी आल्यानंतर परत त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे पुन्हा त्यास कागलच्या ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदरचा मृत्यू हा अपघात नसून तो घातपात आहे. याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी भाऊ विक्रम वसंतराव पाटील याने कागल पोलिसांकडे लेखी पत्रांन्वये व शिष्टमंडळाद्वारे केली आहे.
पोलीस ठाण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये संदीप भोसले, सुरेश वाईंगडे, रोहित वाईंगडे, गणेश भोसले, रेवती बरकाळे, युवराज पाटील, श्रीकांत पाटील, श्रीपती कासोटे यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या
कागल पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मोनिका खडके यांनी पोस्टमार्टम चा रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ कारवाई करू असे आलेल्या शिष्टमंडळास दिले. पुढील तपास हवालदार अशोक पाटील हे करीत आहेत.