बातमी

मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल

कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात दाखल केला दावा

कोल्हापूर दि.२८ :

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री श्री मुश्रीफ यांच्यावतीने ज्येष्ठ वकील व कायदेतज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस व त्यांचे सहकारी ॲड सतीश कुणकेकर यांनी हा दावा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी, या दाव्यामध्ये मंत्री श्री मुश्रीफ यांची गेल्या पंचवीस वर्षाची राजकीय व सामाजिक कारकीर्द मांडलेली आहे. श्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या कामकाज आदी उल्लेख यामध्ये आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या उभारणीत नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून केलेले सामाजिक काम, वैद्यकीय सेवा व समाजसुधारणा आदी बाबींचा उल्लेखही यामध्ये आहे. या सगळ्यामुळे मंत्री श्री मुश्रीफ यांची वाढत चाललेली लोकप्रियता व त्यामुळे हाताश होऊन श्री.सोमय्या व चंद्रकांत पाटील यांनी वारंवार धादांत खोटे आरोप व वस्तुस्थितीची विपर्यास समाजासमोर मांडण्याचा आरोपही केला आहे. मंत्री श्री मुश्रीफ, यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या दृष्टीने श्री सोमय्या यांनी एडीकडे खोटे, चुकीचे आरोप व खोटी कागदपत्रे दाखल केल्याचेही यामध्ये म्हटले आहे. श्री मुश्रीफ यांची बदनामी करण्याच्या उद्देशानेच खोट्या चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन श्री सोमय्या यांनी बेकायदेशीर व अधिकाराच्या कृत्यांमुळे श्री मुश्रीफ यांचे विषयी गैरसमज पसरवून बदनामी केल्याचा आरोप की दाव्यात आहे.


याबाबत न्यायालयाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना ॲड प्रशांत चिटणीस म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खोटेनाटे आरोप व बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. श्री सोमय्या व चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची बदनामीकारक वक्तव्य प्रसिद्ध करु नयेत, अशी मनाईही दाव्यात मागितलेली आहे. आम्ही न्यायालयात कालच परवानगी मागितली होती की श्री सोमय्या आज कोल्हापुरात असल्यामुळे त्यांना समन्स व नोटीस लागू करावे. त्यानुसार कोर्ट समन्स व नोटीस लागू करण्यासाठी हाॅटेल आयोध्यावर कोर्ट बेलिफ गेले होते, परंतु किरीट सोमय्या यांनी ते समन्स व नोटीस लागू करून घेतले नाही तसेच या दाव्यात चंद्रकांत पाटील यांना सुद्धा आम्ही पक्षकार केली आहे, कारण त्यांच्या चिथावणीमुळेच हा सगळा प्रकार घडत आहे. चंद्रकांत पाटील यांचे घरी कोर्ट समन्स व नोटीस लागू करण्यासाठी बेलीफ गेले होते. त्यावेळी आता ते झोपलेले आहेत. नोटीस उद्या घेऊन या असे उत्तर देण्यात आले. या पद्धतीने या दोघांनीही कोर्ट आदेशाचा अवमान कोर्टाविषयी उदासीनता व अनादर दाखवलेला आहे. त्याबद्दल दाद मागितली त्यावर न्यायालयाने ही नोटीस या दोघांनाही पुन्हा लागू करा, असे आदेश दिले व यासंदर्भातील सुनावणी येत्या शुक्रवारी म्हणजेच १ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे.


One Reply to “मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडून किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटीचा दावा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *