कागल / प्रतिनिधी –
कागल तालुक्यातील वंदूर येथील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन कृष्णात माने यास ताब्यात घेऊन कागल पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 1 लाख 15 हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटरसायकली कागल पोलिसांनी ताब्यात घेतल्या. पोलीसांच्या या कारवाईने मोटरसायकल धारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे.त्याच्याकडून अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले आहे. कागल व परिसरात मोटरसायकली चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या अनुषंगाने मोटर सायकल चोरट्यास पकडण्याकरिता कागल पोलीसांकडून मोहीम राबविण्यात आली. झालेल्या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील आरोपी लखन माने यास कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौकामध्ये कागल पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कागल पोलिस ठाणे हद्दीतील शाईन व स्प्लेंडर अशा दोन, गोकुळ शिरगाव पोलिस ठाणे हद्दीतील स्प्लेंडर एक .पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील प्लेटिना आणि स्प्लेंडर दोन मोटरसायकली ताब्यात घेतल्या. तसेच कागल मधून ट्रॅक्टर चोरी केल्या बाबतचा तपास सुरू आहे. आरोपी कडून घरफोडी तसेच चेन स्नॅस्चिंगचे प्रकार उघडकीस येणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अधीक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभागाचे संकेत गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, सहाय्यक निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उप निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अंमलदार विकास चव्हाण, राजू सावंत, महिला पोलीस आमलदार आसमा जमादार यांनी ही कारवाई केली.