कोल्हापूर, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. 5 जून 2023 रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये सकाळी 7 ते 9 या कालावधीत प्लास्टीक कचरा संकलन आणि परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यासारख्या समस्यांना तोंड देताना पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) हद्दीलगतच्या 15 ग्रामपंचायतींनी स्वच्छता श्रमदानाचे आयोजन केल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली.
यामध्ये विशेषतः जिल्ह्यातील शिरोली पु. गोकुळ शिरगाव आणि कागल या तीन औद्योगिक विकास महामंडळ हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींनी ज्या भागामध्ये कच-याचे प्रमाण जास्त आहे अशी ठिकाणे स्वच्छता श्रमदानासाठी निश्चित करुन उपक्रम प्रभावीपणे राबविला. ग्राम पंचायतीमार्फत स्वच्छता साहित्य आणि कचरा संकलनासाठी वाहनांची उपलब्धता करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, हलसवडे, नेर्ली, तामगाव, शिये तसेच हातकणंगले तालुक्यातील शिरोली पु. नागाव, टोप, तिळवणी, पट्टणकोडोली, तळंदगे तर कागल तालुक्यातील क. सांगाव, रणदेवीवाडी या गावांमध्ये स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तरुण मंडळे, महिला तसेच ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.