बातमी

पन्नास किल्ले दत्तक दिल्यास त्यांचे ऐतिहासिक पद्धतींनुसार संवर्धन करण्याची जबाबदारी मी घेतो – युवराज संभाजीराजे छत्रपती

 ३५० व्या शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रागडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला…

रायगड  : केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे असणारा दुर्गराज रायगड राज्य शासनाकडे वर्ग करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीवतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात ते बोलत होते. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमुर्तीवर ३५० अस्सल सोन्यपासून बनवलेल्या सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक करण्यात आला त्याचवेळी मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या मर्तीवर सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक झाला. दुर्गराज रायगडावर सुमारे पाच लाखाहून अधिक शिवप्रेमींच्या उपस्थितीत सोहळा दिमाखात साजरा झाला. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, ढोल ताशाचा ठेका, मर्दानी खेळ व पालखी मिरवणुकीतील जल्लोष वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले,‌ “गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. हेच गडकोट जिवंत स्मारके आहेत. रायगड किल्ला महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात  द्यावा. गडावर काम करण्यासाठी अनेक अडचणी येतात. राज्यातील पन्नास किल्ले दत्तक दिल्यास त्यांचे ऐतिहासिक पद्धतींनुसार संवर्धन करण्याची जबाबदारी मी घेतो. उपमुख्यमंत्र्यांनी तिथीनुसार साजरा झालेल्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यात गडपायथ्याला शिवसृष्टी साकार करण्यासाठी ५० कोटी रुपये जाहीर केले. पण, हे सरकार गडकोटांच्या संवर्धनाबाबत कधी बोलणार?”

ते म्हणाले, “शिवरायांच्या नावात ताकद असून, त्यांनी स्वाभिमानाचा मंत्र दिला आहे. त्यांनी कष्टकऱ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुस-या धर्मावर कधीही अत्याचार केला नाही पण स्वधर्म आणि आमच्या संस्कृतीला डिवचाल तर त्याची गय केली जाणार नाही हिच महाराजांची शिकवण होती. आपणही त्याच शिकवणीवर चालले पाहिजे.

यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या मार्गदर्शिका युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासह समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सतेज पाटील, संजय पोवार, विनायक फाळके, डॉ.धनंजय जाधव, डॉ.राहुल शिंदे, अतुल चव्हाण, चंदूकाका सराफचे  सिद्धार्थ शहा  व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संभाजीराजेंचे शिवभक्तांना आवाहन....
शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू झाल्याने शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली. होळीच्या माळावर त्यांची मोठी रांग लागली होती. प्रत्येक जण स्वयंसेवक,‌ पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. अशा कठीण परिस्थितीत संभाजीराजे थेट होळीच्या माळावर आले. दुपारी ऊन्हाचा कडका असताना ते शिवभक्तांना शांततेचे आवाहन करत होते. त्यानंतर युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती नियंत्रण कक्षात आल्या. त्यांनी शिवभक्तांची विचारपूस करत त्यांना शांततेने गड उतरण्याचे आवाहन केले. 

सकाळी युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले, जिल्हा परिषदेच्या शेडपासून शिवछत्रपतींच्या पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. हलगीच्या ठेक्यावर जिल्हा परिषदेच्या शेडमधून पालखी होळीचा माळ, नगारखान्यातून राजसदरेवर आली. त्यानंतर ही पालखी पुन्हा नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठमार्गे जगदीश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली.

समितीच्यावतीने यावर्षी सलग तीन दिवस गडावर येणा-या शिवभक्तांसाठी अन्नछत्र सूरू होते, याचा साधारण तीन लाख शिवभक्तांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *