बातमी

जिल्हा ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला गडहिंग्लजमध्ये उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार अध्यक्षस्थानी

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्हा ग्रंथालय कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन शनिवार 10 व रविवार 11 फेब्रुवारी 2024 या कालावधीत शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तसेच पुणे महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रंथोत्सव 2023 कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.

 कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, राज्याचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक, पुणे विभाग तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्षा शालिनी इंगोले, गडहिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

10 व 11 फेब्रुवारीला होणाऱ्या ग्रंथोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

10 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या ग्रंथोत्सवात सकाळी 8.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दसरा चौक, गडहिंग्लज येथे ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक मान्यवर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, सार्वजनिक ग्रंथालयांतील पदाधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमी सहभागी होणार आहेत. या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने होणार आहे. दुपारी 3 वाजता “मी वाचलेले पुस्तक” यावर गडहिंग्लज येथील निवडक विद्यार्थ्यांचे मनोगत व मुक्ता चैतन्य, पुणे यांचे “डिजिटल जगाची बदलती आव्हाने” यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

     ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता “जागर शिव-शाहू विचारांचा” यावर युवराज पाटील, गारगोटी यांचे व्याख्यान तर दुपारी 2 वाजता जयवंत आवटे, कुंडल, जि.सांगली यांचे “कथाकथन” आयोजित केले आहे. दुपारी 3 वाजता गौरी भोगले यांच्या अध्यक्षतेखाली “कवी संमेलन” होणार असून या कवी संमेलनामध्ये सर्वश्री डॉ. निलेश शेळके, डॉ. आनंद बल्लाळ, प्रा. सुभाष कोरे, विलास माळी, निर्मला शेवाळे, संजय कांबळे, नंदकुमार गोरुले, सिध्दाप्पा बंदी, ओंकार बजागे, निळकंठ कुराडे, अनिल कलकुटगी, संतोष पाटील, रविंद्र कामत व शिवाजी शिंदे आदिंचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार करणार आहेत.

            दुपारी 4 वाजता ग्रंथोत्सव सोहळ्याचा समारोप समारंभ साहित्यिक शिवशंकर उपाशे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एस. एम. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

ग्रंथोत्सवात शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार असून यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे श्रीमती वाईकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *