मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील स्वराज्य स्पोर्ट्सच्या वतीने निमंत्रित १६ संघांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा थरार कन्या शाळेच्या मैदानावर डे नाईट प्रकाशझोतात रंगला. प्रथमच कागल तालुका प्रीमियर लीग २०२४ या स्पर्धा झाल्या. तालुक्यातील गाजलेल्या २८६ खेळाडूंचा लिलाव करण्यात येऊन त्याचे संघ तयार करण्यात आले.
राणा प्रताप क्रिकेट क्लब आणि लाल आखाडा व्यायाम मंडळ यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राणा प्रताप संघाने सागर मकवानाच्या षटकार व चौकारांच्या फटकेबाजीमुळे ३ बाद ८७ धावांचा डोंगर रचला. बाबुराव जाधव, सागर मकवाना आणि सागर सापळे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रत्युत्तरादाखल लाल आखाडा व्यायाम मंडळ ६ बाद ४७ इतक्याच धावा जमवू शकले.
डंग्या स्पोर्ट्स मुरगुड आणि ए एस स्पोर्ट्स करणूर यांना अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक देण्यात आला. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे अशी- बेस्ट फिल्डर -गणेश तोडकर ( लाल आखाडा, मुरगूड), बेस्ट बॉलर- बाबुराव जाधव (राणाप्रताप, मुरगूड), बेस्ट बॅटस्मन- राजू तोरस्कर ( ए एस स्पोर्टस करणूर), मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच – सागर मकवाना (राणा प्रताप, मुरगूड), उत्कृष्ट संघ- शरण्या स्पोर्ट्स निढोरी.
बक्षीस वितरण प्रसंगी श्रीमंत शहाजीराजे, कुस्तीसम्राट अस्लम काझी, जि. प. सदस्य मनोज फराकटे, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, बटू जाधव, माजी सरपंच अमित पाटील, अभिनव पाटील (निढोरी), संताजी घोरपडे कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय घाटगे, जिल्हा दक्षता कमिटीचे सदस्य विजय जाधव, किरण गवाणकर, दीपक बहुधान्ये यांच्यासह मान्यवर व क्रीडारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक सुशांत मांगोरे, सूत्रसंचालन अनिल पाटील, क्रीडा समालोचन बाळू मणेर, गुणलेखन सर्वेश पोतदार यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुशांत मांगोरे, नंदू खराडे, सागर सापळे, अनिकेत बेनके, रमेश वाइंगडे, समाधान बोते, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजित चौगले, पंकज नेसरीकर, पंकज मेंडके, अमित तोरसे व सुनील कांबळे यांच्यासह अनेकांनी सक्रिय योगदान दिले.