बातमी

वेदगंगेच्या कुरणी बंधाऱ्याजवळील ओढ्यातील कचरा, गाळ, बाटल्या ट्रकभर काढला बाहेर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड जवळ च्या कुरणी बंधाऱ्या जवळ वेद गंगेला मिळणाऱ्या ओढ्यात अगदी तोंडावर टाकाऊ बाटल्यांचा ढीग, पाण्याच्या, औषधाच्या, कीटक नाशकांच्या अशा नाना तऱ्हेच्या बाटल्या होत्या. नदीच्या संगमावर हा ढीग म्हणजे जणू वेद गंगेला कचऱ्याचा आहेरच होता.
 

  नेहमीच स्वच्छता आणि सामाजिक कामात अग्रेसर  असणाऱ्या शिवभक्त स्वयंसेवकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी प्रथम नगरपरिषदेच्या कचरा गाडीला कळवले.

     प्रश्न खरोखर गंभीर होता.कडक उन्हाळा. निदान पिण्याच्या पाण्याची टंचाई येऊ नये म्हणून नगरपरिषद नेहमी दक्ष असते. सरपिराजी तलाव व वेद गंगेच्या पाण्यावर शहराची तहान भागवली जाते.तलाव पातळी खाली गेल्याने मे महिन्यात वेदगंगा पात्रातून पाणी पुरवठा होतो. नेमके हेच पिण्याचे पाणी  कचरायुक्त सांडपाण्याचे प्रदूषित होत आहे.

     शिवभक्त स्वयंसेवक व नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगार यांनी भल्या सकाळी कामाला सुरुवात केली. डास, माशा व सरपटणारे जीव यांची कसलीही पर्वा न करता ट्रक भर गाळ बाहेर काढला आणि वेदगंगेला प्रदूषण मुक्त केले.

    एवढ्यावर थांबून चालणार नाही.नदीकाठी पार्ट्या.करणाऱ्या रस्सा मंडळांना सुध्दा रोखले पाहिजे. खरकट्या पत्रावळ्यांचे ढीग पण कधी काठावर पहायला मिळतात.बियर व दारू च्या बाटल्या विचकट हसल्या सारख्या वाटतात. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी केलेली ही क्रूर चेष्टाच  वाटते. ती करणाऱ्यांना तरी शरम वाटावी.

    स्वच्छ सुंदर मुरगूड काय फक्त नगरपरिषदेने सांभाळायचे. सर्वांनीच काळजी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटू लागली आहे. गाळ काढून नदी प्रदूषण मुक्त करणाऱ्या युवक व कामगाराचे कौतुक होत आहे.

    सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव सर्जेराव भाट व नगरपरिषेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम बबन बारदेस्कर यांनी पुढाकार घेतला.त्यांना भिकाजी कांबळे,मोहन कांबळे,ओंकार पोतदार,राजू कांबळे,दत्ता बरकाळे,सातापा कांबळे,दिलीप पाटील,किसन कांबळे,विक्रम कांबळे इत्यादींनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *