बातमी

राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांचे प्रत्युत्तर

मूरगूड, दि. २५: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांची अफाट जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उभारलेले श्रम मंदिर आहे. विघ्नसंतुष्ट प्रवृत्ती शेतकऱ्यांच्या श्रम मंदिराला गालबोट लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, अशी समज देणारे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षडयंत्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची कोणतीही चौकशी व शहानिशा न करता दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही म्हटले आहे.

आमदार हसन साहेब मुश्रीफ यांच्यावर मुरगुडात दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सूटबुद्धीतूनच दाखल केला आहे असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे, कागल येथील विवेक कुलकर्णी व अन्य ज्या १६ लोकांनी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ही तक्रार ताबडतोब परत घ्यावी. कारण, ही निखालास खोटी व राजकीय दबावापोटी दिलेली तक्रार आहे. ही तक्रार कोणाच्या सांगण्यावरून झालेली आहे, हे जग जाहिरच आहे. जनता या कुणालाही माफ करणार नाही. कारण, या तक्रारीमुळे दर महिन्याला मिळणारी सवलतीची साखर व अन्य सोयी- सुविधा बंद होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना अत्यंत व्यवस्थित व सुरळीतपणे यशस्वी वाटचाल करीत आहे. संपूर्ण चाळीस हजार सभासदांची तसेच या तक्रारदारांपैकी गेल्या बारा वर्षात कोणाचीही साधी तक्रार नाही. त्यांना ही अवदसा आत्ताच का आठवली? याचेही उत्तर तुम्हाला जनतेला द्यावेच लागेल.

या पत्रकावर गोकुळचे संचालक युवराज पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, मुरगुड शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *