बातमी

संविधानिक राजकारण हिच खरी राजकारणाची दिशा – सुषमाताई अंधारे

निढोरीत डॉ.आंबेडकर जयंतीला मान्यवरांसह श्रोत्यांची उपस्थिती

मुरगूड ( शशी दरेकर ) : भारताचे राजकारण हे भावनिक व व्यक्ती वलयांकित राजकारण आहे.दलित,ओबीसी व महिला यांच्यासाठी राखीव असणाऱ्या जागेवर अधिकारांच आकलन नसणार्‍या,राजकीय अशिक्षित लोकांना उमेदवारी देऊन निवडुन आणले जाते.अशा उमेदवारांना पोझिशन दिली जाते पण पावर ही अभिजनवादी लोकांकडेच असते.त्यामुळेच देशामध्ये नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे शिवाय रोजगार,आरोग्य यासारख्या मुलभुत प्रश्नांना फाटा मिळत आहे.अशा वेळी व्यक्तीप्रतिष्ठा जपणं व संविधानाच्या चौकटीत राहून वैचारीक व रचनात्मक राजकारण करणं हिच खरी राजकारणाची दिशा आहे असं मत जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ सुषमाताई अंधारे यांनी व्यक्त केलं.त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे होते.

निढोरी ता.कागल येथे सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील व अॅटवन्स कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ निढोरी यांच्या संयोजनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आयोजित केली होती.या जयंतीनिमित्त जेष्ठ विचारवंत,सामाजिक कार्यकर्त्या, प्रा.डाॅ.सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.त्यांनी ‘आजचे राजकारण, दिशा व दशा’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.या कार्यक्रमाचे स्वागत बी.एल.कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सावंत यांनी केले.

प्रा.अंधारे पुढे म्हणाल्या,महिला धोरणानुसार महिलांना राजकारणात संधी मिळत आहे पण कर्तुत्ववान महिलांना अपवादच संधी मिळते.बाकी सर्व महिला या पुरुषाच्या राजकीय प्रमोशनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विश्वस्त म्हणून राजकारणात पुढे येताना दिसत आहेत ही लोकशाही व्यवस्थेसमोरील मुख्य समस्या आहे तर गावगाड्यातल्या ओबीसी बांधवांचे व्यवसाय लुप्त होत आहेत अशावेळी ओबीसींच्या जगण्याच साधन काय ? हा प्रश्न निर्माण होत आहे. जोपर्यंत सभागृहात ओबीसींचे प्रतिनिधी वाढणार नाहीत तोपर्यंत ओबीसींचे प्रश्न मिटणार नाहीत अशावेळी जर सरकारला खरंच ओबीसी बांधवांच्या सन्मानाची चाड असेल तर भाजप सरकारने ओबीसी वर्गाची स्वतंत्र जनगणना करावी व लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व द्यावे.

यावेळी संविधान सन्मान पुरस्कार प्राप्त झालेबद्दल अस्मिता प्रधान यांचा सत्कार केला तर सामाजिक सेवा पुरस्कार प्राप्त झालेबद्दल शशिकांत खोत यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी दलितमित्र डी .डी.चौगले,दलितमित्र एस.आर.बाईत,दलितमित्र एकनाथराव देशमुख,विठ्ठल कांबळे,माजी सरपंच जयश्री पाटील,ग्रा.पं.सदस्या उषा कांबळे,ग्रा.पं.सदस्या सरिता मगदूम,सारीका पाटील इत्यादी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते तर विचारपीठासमोर माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन -किरण गवाणकर,एस.व्ही.चौगले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील,माजी सभापती जयदीप पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे,नंदु पाटील,बी.एम.पाटील,प्रकाश भिऊंगडे,विठ्ठल जाधव,अनिल सिद्धेश्वर,मिलिंद प्रधान, सुखदेव सागर इत्यादी मान्यवर व हजारोंच्या संख्येने श्रोते मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार संतोष मोरबाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *