बातमी

ऊसतोडीसाठी आलेला जालना जिल्ह्यातील युवक भडगांव येथून बेपत्ता

मुरगूड ( शशी दरेकर ) : ऊसतोड करण्यासाठी आलेला जालना जिल्ह्यातील कु. धम्मपाल रवीकांत पहाडे हा १६ वर्षीय युवक भडगाव (ता.कागल) येथून बेपत्ता झाल्याची तक्रार मुरगूड पोलीस ठाण्यात त्याच्या वडीलांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील बामणी,ता.परतुर येथील रवीकांत भुजंग पहाडे (वय ३७ ) हे ऊस तोडणी कामगार गेल्या चार वर्षापासून कोगनोळी,ता.चिकोडी,जि. बेळगांव येथे आपली पत्नी रंजना,मुलगा धम्मपाल,यश,व मुलगी निकीता असे कुटुंब राहत आहे. रवीकांत व त्याची पत्नी कोगनोळी ग्रामपंचायतीकडे स्वच्छता कामगार म्हणून रोजंदारीवर काम करतात तर त्यांचा मुलगा धम्मपाल व आई रंजना हे दोघे उसतोड मुकादम नाना पगारे व इतर उसतोड कामगारासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील गोरंबे,(ता.कागल ) येथे गेले होते.

डिसेंबरमध्ये रंजना कोगनोळीला परत गेली तर धम्मपाल हा आईचे चुलते दत्ता भदलगे व चुलती आशाबाई भदलगे यांच्या सोबत गोरबे येथेच राहत होता. गेल्या एक महिन्यापासून सदरची उस टोळी ही भडगांव (ता कागल ) येथे उसतोडीचे काम करीत असल्याने टोळीतील कामगार भडगाव येथील नाळ्या नावच्या शेतात थांबले होते. मुलगा धम्मपाल हा देखील तेथेच राहणेस होता. तो चार पाच दिवसातून घरी फोन करून घरच्यांशी बोलत होता. पण ३० जानेवारी रोजी धम्मपाल याने आपल्या वडीलांना फोन करुन आपल्याला हे लोक ऊसतोडू देत नाहीत असे सांगितले.

मुकादमही त्याच्या वडीलाशी फोनवर बोलले. त्यानंतर वडील रवीकांत पहाडे व आई रंजना हे दोघे लगेच भडगाव येथे आले तर त्यावेळी धम्मपाल तेथे नव्हता. मुकादमला विचारले असता असेल येथेच असे सांगितले. रात्र झाली तरी तो मिळून आला नाही. त्यानंतर सर्वांनी आसपासच्या गावातून त्याचा शोध घेतला पण तो मिळून आलेला नाही. उंची ५ फुट ५ इंच रंगाने सावळा,अंगाने सडपातळ,नाक सरळ, अंगात निळा रंगाचा टीशर्ट,जीन्स पँट मराठी,हिंदी बोलतो.अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास मुरगूड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *