बातमी

मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले यांचे आकस्मिक निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) :
जून्या पिढीतील नामवंत मल्ल उपमहापौर केसरी आणि मुरगूडचे माजी नगराध्यक्ष पैलवान प्रकाश सखाराम चौगले (वय ६२ ) यांचे शुक्रवार दि. १ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यांने आकस्मिक निधन झाले. मुरगूडच्या सामाजिक , राजकीय व क्रीडाक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते .
विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी कोल्हापूरच्या काळाईमाम तालमीत कुस्तीचे धडे गिरविले. मितभाषी, उत्तम शरीरसंपदा आणि अत्यंत शांत स्वभावामूळे राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग होता . आपल्या क्रीडागुणांच्या बळावर त्यांनी उपमहापौर केसरी पदापर्यंत झेप घेतली. कुस्तीतून निवृत्त झाल्यावरही त्यांनी अनेक वर्षे काळाईमाम तालमीत वस्ताद म्हणून काम केले.त्यांच्या अनेक मल्ल शिष्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला. कबड्डी खेळाच्या विकासाला त्यांनी सातत्याने पाठबळ दिले.

कुस्ती क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर ते मुरगूडच्या राजकारणात सक्रीय झाले. दिवंगत खासदार लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांना मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट दिले. पहिल्याच निवडणूकीत त्यांनी विजय मिळविला. स्व. लोकनेते मंडलिक साहेबाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांनी प्रकाश चौगले यांना मुरगूडचे नगराध्यक्ष केले. क्रीडाक्षेत्रा बरोबरच त्यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासात मोठे योगदान दिले. चौगले गल्ली तालीम मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.

स्व.खासदार मंडलिक साहेबांच्या बरोबरीने त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत काम केले. त्यांच्या पत्नी सौ. संगीता मुरगूडच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , विवाहीत मुलगी , भाऊ रघुनाथ चौगले ,चुलते डॉ. बाजीराव चौगले , पुतणे पैलवान श्रीकांत चौगले , शशीकांत चौगले , रंगराव चौगले, बाळकृष्ण चौगले व रणजीत चौगले असा मोठा परिवार आहे.
सायंकाळी शोकाकूल वातावरणात मुरगूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *